नाशिकजवळ सिन्नर – शिर्डी महामार्गावर कोपर्डी गावाजवळ शुक्रवारी रात्री उशीरा ट्रक, ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून १९ जण या अपघातात जखमी झाले आहे.

सिन्नर शिर्डी महामार्गावर शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास रात्री बस, ट्रक आणि ट्रॅक्टर असा तिहेरी अपघात झाला.  अपघाताचे वृत्त समजताच तीन क्रेन आणि सात रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातातील जखमींना नाशिक आणि सिन्नरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.  अपघात कसा झाला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या अपघातामुळे सिन्नर – शिर्डी मार्गावरची वाहतूक सुमारे तासभर ठप्प होती.

राजेंद्र इंगळे, राहुल भवर आणि सुधीरकुमार बोहरा अशी या मृतांची नावे आहेत. इंगळे हे लक्झरी बसचे चालक असून ते वैजापूरचे रहिवासी आहेत. तर राहुल भवर हे नगर जिल्ह्यातील रहिवासी होती. सुधीरकुमार बोहरा हे ओडिसाचे रहिवासी आहेत. या अपघाताप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.