मान्सुनने केरळमधून जोरदार वाटचाल सुरु केली असली तरी नगर जिल्ह्यातील आगमनाला मात्र चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. मात्र ढगाळ हवामानामुळे तापमान कमी झाले असून ते आणखी कमी होईल अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील आठवडय़ात कमाल तापमान ३२.८ ते ४० अंश सेल्सिअस व किमान तापमान २१.४ ते २६.४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. वाऱ्याचा वेग ताशी २ ते ११.२ किलो मीटर होता. कमाल आद्र्रता ५१ ते ८३ व किमान अद्र्रता २५ ते ५२ टक्के होती. जिल्ह्याच्या काही भागात मान्सुनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मात्र बहुतेक भाग कोरडा होता. मान्सूनपूर्व पाऊस न झाल्याने मशागतीची कामे खोळंबली आहे. तसेच उन्हाळ्यात जगविलेली पिके पाण्याअभावी पावसाळ्यात जळून चालली आहेत.
आत्तापर्यंतच्या अनुभवावरुन मान्सूनच्या पावसाचे ७ जूनच्या दरम्यान जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पहिल्या पंधरवडय़ात चांगला पाऊस होतो. मात्र दुसऱ्या पंधरवडय़ात त्याचा जोर कमी होतो.
आता मान्सून दुसऱ्या पंधरवडय़ात जिल्ह्यात आगमन करीत आहे. त्यामुळे त्याचे प्रगती बद्दल उत्सुकता आहे. दुसऱ्या पंधरवडय़ात नेहमीप्रमाणे ताण मिळाला तर पेरण्या लांबू शकतात. राज्यात मान्सूनची जोरदार आगेकूच सुरु असली तरी पर्जन्यछायेखाली असलेल्या नगर जिल्ह्यात काय स्थिती राहील हे पाच दिवसांनंतरच समजणार आहे. असे ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाचे म्हणणे आहे.
येत्या ४८ तासात कोकणात मान्सूनचे आगमन होत आहे. त्याचा फायदा नगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा या दोन्ही धरणांना तसेच पुणे जिल्ह्यातील धरणांना होईल. जिल्ह्यात पाच दिवस मान्सून उशिरा येत असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचे आगमन दोन दिवसांत अपेक्षित आहे. पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन झाले तर धरणाच्या पाणीसाठय़ात वाढ झाल्यास त्याचा फायदा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.