भाजप हा शेटजी भटजींचा पक्ष असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ‘भाजपला मोठे करणारे बहुजन नेते अडगळीत गेले आहेत. तर गडकरी, जावडेकर, गोयल सत्तेत मिरवत आहेत,’ असा घणाघात अजित पवारांनी केला आहे.

‘भाजप शेटजी आणि भटजींचा पक्ष आहे, असे मी लहानपणी ऐकायचो. ज्या बहुजन नेत्यांनी पक्षाला चेहरा दिला, तीच मंडळी आता सत्ता आल्यावर अडगळीत गेली आहेत. मुंडे, डांगे, फरांदे अशा व्यक्तींनी भाजपला बहुजन चेहरा दिला. मात्र सत्ता आल्यानंतर हे सर्व नेते अडगळीत गेले. सध्या सत्तेत गडकरी, जावडेकर, प्रभू आणि पियुष गोयल यांच्यासारखी मंडळी मिरवत आहेत. त्यामुळे भाजप केवळ बहुजन समाजाचा वापर करुत घेत आहे,’ अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

माढा तालुक्यातील पिंपळनेरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवरही शरसंधान साधले. पुण्यातील गुंड बाबा बोडके प्रकरणी मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत. वर्षा बंगल्यावर बाबा बोडके आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. मोदी आणि फडणवीसांनी फुले, शाहू आणि आंबेडकरांची विचारसरणी खुंटीला टांगून ठेवल्याचा आरोपदेखील अजित पवारांनी केला आहे.

‘मुख्यमंत्री आणि इतर मंत्री विदर्भातील आहेत. त्यामुळे ते पश्चिम महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत’, असा आरोपदेखील अजित पवार यांनी केला. सोलापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रात कोणीच खमका मंत्री नसल्याने कोणीच या सरकारवर जोरात बोलू शकत नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे, असेही अजित पवार पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांनी ऍट्रॉसिटीच्या मुद्यावरुनही फडणवीस सरकारला धारेवर धरले. ऍट्रॉसिटी कायद्यातील चुकीच्या तरतुदी काढून, त्यात दुरुस्ती करण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी योग्य असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे.