‘समता का समरसता?’ या द्वंद्वात काही हशील नाही. हा शब्दच्छल आहे. समता भारतीय संविधानातच आहे. ती कशी रुजवली जाईल हे पाहिले, तरच भारत घडेल, असे प्रतिपादन कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी मंगळवारी केले. तर, समता प्रस्थापित करण्यासाठी आणि आलेली समता टिकवण्यासाठी समरसता आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक समरसता मंचाचे अखिल भारतीय संयोजक भिकूजी इदाते यांनी केले.
‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात आयोजित ‘समता की समरसता?’ या विषयावरील चर्चासत्रात डॉ. बाबा आढाव, भिकूजी इदाते आणि डॉ. रावसाहेब कसबे यांनी सहभाग घेतला. समरसता हा शब्द संघाकडून आलेला असून त्यांच्याकडूनच त्याचा आग्रह धरला जात आहे. मुळातच भारतीय राज्यघटनेत असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, समाजवाद, विज्ञाननिष्ठा ही मूल्यं आम्ही मानणार की नाही हा खरा प्रश्न आहे. बोलण्यात समरसता असली, तरी तसे आचरण मात्र दिसत नाही, असे डॉ. आढाव यांनी या वेळी सांगितले. समता की समरसता याचे एका गणितासारखे उत्तर देता येणार नाही. लोकशाही मार्गाने जगात भारत म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करायची असेल, तर राज्यघटनेतील मूल्य मानावीच लागतील आणि ती रुजवावी लागतील. ती रुजवण्यात आडकाठय़ा निर्माण करू नका, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.
समरसता संकल्पनेविषयी बोलताना भिकूजी इदाते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समता हे मूल्य मानतो आणि समता, समानता टिकवण्यासाठी ती स्थिर होण्यासाठी समरसता हवी हेही संघ मानतो. समता टाळण्यासाठी संघाने समरसता आणलेली नाही. त्या शब्दाला संघाचा विरोधही नाही. परंतु या देशाच्या, समाजाच्या परंपरा लक्षात घेऊन कार्यक्रम ठरवावे लागतात. शब्दरचना करावी लागते. समता, समानता ही बुद्धीची भाषा आहे आणि समरसता ही हृदयाची भाषा आहे. म्हणून समरसता ही संकल्पना संपूर्ण समाजाला कवेत घेणारी आणि वंचितांना न्याय देणारी आहे. त्यासाठी आम्ही समरसता शब्दाचा आग्रह धरला आहे. परंपरेचा धागा न तोडता चुकीचे आहे ते नाकारून पुढे गेले पाहिजे, अशी धारणा आहे. जे खराब आहे ते दूर करण्यासाठी समरसता मंचाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती इदाते यांनी दिली.
समता हक्क देणारी आहे, तर समरसता याचा अर्थ आपले अस्तित्व समाजात विसर्जित करा असा आहे. समरसता अस्तित्व नष्ट करणारी आहे. स्वातंत्र्य आणि बंधुता यांच्यामधील गोष्ट आहे समता. या देशाला हिंदू संस्कृतीने सतत दुर्बल केले आहे. म्हणून या देशात नवी संस्कृती, नवा धर्म आणावा लागेल. प्रत्येक माणसाच्या सुप्तशक्तीच्या प्रगटीकरणाला वाव मिळेल अशी रचना निर्माण करणे म्हणजे समानता. अशा काळात धर्म, राष्ट्र, जात आदी कूपमंडू विचार सोडून दिला पाहिजे आणि वर्तमानाच्या प्रकाशात भूतकाळ समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

प्राचीन हिंदू राष्ट्राचे पुनरुज्जीवन, एक संस्कृती हिंदू संस्कृती आणि एक राज्य अखंड हिंदुस्थान हे संघाने मांडलेल्या समरसतेचे गंतव्य आहे. एकीकडे सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि एकीकडे प्रादेशिक राष्ट्रवाद अशी मांडणी केली जाते. म्हणून हे शब्द नीट समजून घेतले पाहिजेत.  – डॉ. रावसाहेब कसबे

loksatta analysis drug shortage hit on tb elimination plan
विश्लेषण: क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार का? 
Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
india bloc rally to save constitution
‘इंडिया’ची सभा राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी- काँग्रेस