शेतकरी, बेकार तरुणांना हात देणाऱ्या सहकार क्षेत्राला बदनाम करून हे क्षेत्र उद्ध्वस्त करण्याची चाल युती शासन खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी केला.
राष्ट्रीयीकृत बँक आणि सहकार बँका यांच्यातील लेखाजोगा केला तर सहकार क्षेत्रानेच राज्याचा विकास केल्याचे सांगून त्यांनी जैतापूर अणू प्रकल्पात शिवसेना तोडपाणी करण्याच्या इराद्यानेच विरोध करीत असल्याची टीका केली.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील यांचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी भोसले यांच्यासह जिल्हा बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रदेश युवक सरचिटणीस अतुल रावराणे, विनोद सावंत, डी. जी. सावंत, सदू शेख आदींनी स्वागत केले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष विरसिंह पारछाही उपस्थित होते. त्या वेळी पत्रकारांशी पाटील बोलत होते.
सहकार क्षेत्राने महाराष्ट्राच्या विकासात क्रांती केली, ही क्षेत्रे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने शिवसेना-भाजपने ती उद्ध्वस्त करण्याच्या भावनेने पावले टाकून सहकार क्षेत्राला बदनाम करण्याचे षड्यंत्र आखले आहे. सहकार क्षेत्रातील बँका शेतकऱ्यांना आर्थिक मदत करतात. तरुणांना बँकेत सामावून घेतात, पण राष्ट्रीयीकृत बँकेत मराठी माणूस आहे का पाहा, असा थेट प्रश्नच उमेश पाटील यांनी उपस्थित केला.
सहकार क्षेत्रात शिवसेना-भाजपचे अस्तित्व नसल्याने हे क्षेत्र उद्ध्वस्त करीत आहेत. सहकार क्षेत्रातील बँका शेतकऱ्याला तर राष्ट्रीयीकृत बँका उद्योगपतींना आर्थिक मदत करतात, बुडीत कर्जाचे प्रमाण राष्ट्रीयीकृत बँकांत अधिक असूनही त्या बँकांना त्रास दिला जात नाही, असे उमेश पाटील म्हणाले. शेतकरी कर्ज बुडवत नाही, पण उद्योजक कर्ज बुडवतात, पण याकडे लक्ष दिले जात नाही, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीयीकृत बँका आणि सहकार क्षेत्रातील बँका, साखर कारखाने यांची तुलना केल्यास राज्यात सहकार क्षेत्रातूनच रोजगार, कर्जपुरवठा झाला आहे. सहकार क्षेत्राला बदनाम करणाऱ्या या सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी संघटितपणे लढत आहे. उलट सक्षमविरोधी पक्षाची भूमिका आघाडी बजावत आहे, असे उमेश पाटील म्हणाले.
चिक्की प्रकरणांत पंकजा मुंडे, बोगस पदवीत विनोद तावडे यांनी नैतिकता पाळून राजीनामे द्यायला हवेत. पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील मंत्र्यांनी आरोप सिद्ध होण्याची वाट पाहिली नव्हती. त्यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामे दिले होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने नीतिमत्ता पाळली होती, पण शिवसेना-भाजप सरकारकडे नीतिमत्ता नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संशयाचे बोट सरकारकडे दाखवत आहेत, असे उमेश पाटील म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांचे राजीनामे या मुद्दय़ावर काँग्रेस-राष्ट्रवादी ठाम आहेत. पंकजा मुंडे यांचे चिक्की भ्रष्टाचारासोबत चटई, विनोद तावडे यांचे अग्निशामक खरेदीतही भ्रष्टाचार असल्याचे उमेश पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस सभासद नोंदणी अभियान राबवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी युवकची स्वतंत्र सभासद नोंदणी करून तरुणांना संधी दिली आहे. संदेश पारकर राष्ट्रवादीत परतत असतील तर त्यांचे स्वागत करू, असे उमेश पाटील म्हणाले.
जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. गुंतवणूक व रोजगारावर भर देत प्रकल्प व्हावा, असे त्यांनी सांगितले. लोकांना घाबरवत ठेवण्याची भूमिका शिवसेनेची आहे. यापूर्वी शिवसेनेने एन्रॉन, रिलायन्सला विरोध केला, पण हे प्रकल्प झाले. एन्रॉन प्रकल्पाच्या पहिल्या करारावर शरद पवार यांची भूमिका पाहिली तर लोकांना वीज बिले परवडणारी ठरली असती असे उमेश पाटील म्हणाले.
एन्रॉन प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला, पण प्रकल्प झालाच. तसाच जैतापूर प्रकल्पाला विरोध तोडपाण्यासाठीच असल्याची टीका उमेश पाटील यांनी केली. कायदेशीर मायनिंगला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. खनिज राष्ट्राची संपत्ती आहे. मात्र त्यात येणाऱ्या अनैतिकतेला विरोध आहे, असे उमेश पाटील म्हणाले.