शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारच्या विरोधात उभे ठाकताना भूसंपादन कायदा की शेतकऱ्यांच्या र्सवकष प्रश्नांना अग्रभागी ठेवायचे, या मुद्दय़ावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व देशपातळीवरील शेतकरी नेते यांच्यात फू ट पडल्याचे चित्र आहे.    
ज्येष्ठ समाजसेवकांनी केंद्राच्या भूसंपादन कायद्याविरोधात देशव्यापी आंदोलनाची तयारी म्हणून सोमवारी सेवाग्राम आश्रमापुढील यात्री निवासात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. तीत प्रख्यात जलतज्ज्ञ प्रा. राजेंद्रसिंह, मेधा पाटकर, गोपालन व अन्य असे विविध राज्यांतील ३० नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे आश्रमातीलच आनंदनिकेतनमध्ये अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या तीनदिवसीय किसान संमेलनाला रविवारपासून प्रारंभ झाला. या संमेलनात लिंगराजभाई, भाविनी पारेख, सुभाष पालकर, विजय जावंधिया यांच्यासोबतच प्रा.योगेंद्र यादव उपस्थित होते. किसान संमेलनात भूसंपादन कायद्यासोबतच शेतमालाला भाव, जागतिक तापमान व शेती, कृषीविषयक अनुदान, नैसर्गिक संकटे अशा व अन्य शेतकरी समस्यांवर विचारमंथन होत आहे. शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून या दोन्ही बैठका झाल्या, पण याच प्रश्नावर नियोजित आंदोलनाविषयी मात्र मतभेद दिसून आले असून दोन्ही बैठकीतील नेत्यांनी परस्परविरोधी सूर आळवला.
अण्णांच्या सहकाऱ्यांनी मोदी सरकारला भूसंपादन कायद्याबाबतच धारेवर धरण्याचे ठरविले आहे. मात्र, किसान संमेलनात भूसंपादन कायद्यावरच लक्ष केंद्रित न करता शेतकऱ्यांच्या एकूणच समस्यांवर मोदी सरकारची धोरणे अन्यायकारक असल्याने सर्वच प्रश्न आंदोलनाच्या अग्रस्थानी ठेवण्याची भूमिका घेण्यात आली. मोदींनी प्रचारादरम्यान उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफो धरून हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांबाबत अन्य योजनांचीही हमी दिली होती. मात्र, फक्त कायदाच लक्ष्य केल्यास अन्य प्रश्नांचे गांभीर्य संपेल, अशी भीती संमेलनातील नेत्यांना वाटते. भूसंपादनचा प्रश्न केवळ जमीनमालकांचा म्हणजेच केवळ तीन टक्के शेतकऱ्यांचा आहे. बाकीच्यांचे काय, असा सवाल विजय जावंधिया यांनी केला.
प्राप्त माहितीनुसार हीच भूमिका जावंधिया यांनी मेधा पाटकर यांच्याकडेही मांडून अण्णा व शेतकरी नेत्यांनी एकत्र येण्याचे सुचविले, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या दोन्ही बैठकीत हजेरी लावणाऱ्या मेधा पाटकर या एकमेव होत्या. केंद्र सरकारला लक्ष्य करताना विसंवाद पुढे येऊ नये, यासाठी त्यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून आले.

महात्माजींनी असहकार आंदोलन करताना संपूर्ण स्वातंत्र्य हेच उद्दिष्ट ठेवले होते. ग्रामसफोई, अस्पृश्यता, शिक्षण अशा अन्य बाबी आनुषंगिक होत्या. आंदोलन हे ठरावीक मागण्यांसाठीच असते. मात्र, आमच्यात मतभेद नाही, भविष्यात कदाचित एकत्र येऊ शकतो.
– डॉ. विश्वंभर चौधरी, अण्णा हजारे यांचे विश्वासू सहकारी