केंद्रात मोदी सरकार येऊन तीन वर्ष उलटली तरी भ्रष्टाचार थांबलेला नाही, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. ते बुधवारी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अण्णा हजारे यांनी लोकपाल नियुक्तीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. केंद्र सरकारला लोकपाल नियुक्त करण्याची इच्छा नाही. लोकपालाची नियुक्ती शक्य नसेल तर निदान राज्यांमध्ये लोकायुक्तांची नियुक्ती केली जावी. ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथे लोकायुक्त नेमण्यात काय अडचण आहे, असा सवाल अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला विचारला.

लोकपाल कायदा व्हावा ही जनतेच्या ‘मन की बात’ होती. पूर्वीच्या सरकारने त्यासाठी कायदा केला, पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. हा जनतेच्या भावनांचा अपमान आहे. लोकांना वाटतेय की अण्णा हजारे गप्प बसले आहेत, पण आपण गप्प बसलो नाही. आता पुन्हा एकदा आंदोलन करावे लागेल असे वाटते. दिल्लीत जाऊन ते करण्यासाठी तयार आहे. माझे मनही मला सांगत आहे, पुन्हा एकदा आंदोलन कर. मी त्यासाठी तयार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. त्यामुळे मी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंदोलनाची तारीख कळवणार आहे. या आंदोलनासाठी फेसबुक पेजही तयार करण्यात आले आहे. लोकांना हे फेसबुक पेज लाईक करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही यावेळी अण्णा हजारे यांनी केले.

गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयानेही या लोकपालच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला फटकारले होते. तीव्र संघर्षांनंतर लोकपाल कायदा मंजूर करण्यात आला, त्यामुळे विद्यमान सरकारची इच्छा नसली तरी लोकपालांची नियुक्ती केलीच पाहिजे. सरकारने आतापर्यंत यामध्ये सुधारणा का केली नाही? या कायद्याचे आम्ही कलेवर होऊ देणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला खडसावले होते.