भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाधक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकीचा राजीनाम द्या अन्यथा गोळया घालून जीवे मारू अशी धमकी विलास देशमुख या व्यक्तीने ई-मेलद्वारे दिला आहे. याप्रकरणी जालना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. खासदार रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक राजेश जोशी यांनी विलास देशमुख या व्यक्तीविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली.
प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना विलास देशमुख या व्यक्तीने इंग्रजीमधून प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकीचा राजीनाम न दिल्यास जीवे मारू अशी धमकी दिली आहे. खासदार रावसाहेब दानवे यांनी मात्र ही धमकी गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. राजकारणात असे प्रकार होत असतात असे म्हणत आपण अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली नसल्याचेही सांगितले. खासदार रावसाहेब दानवे सध्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासासाठी केरळ येथील कोझिकोडे येथे गेले आहेत.