परभणीतील काँग्रेसच्या यशानंतर सुरेश वरपूडकर यांचे प्रतिक्रिया

‘वैयक्तिक प्रचारात आम्हाला रस नव्हता. राजकीय विरोधकांना धडा शिकवण्याची आमची भाषाही नव्हती. फक्त विकास आणि धर्मनिरपेक्षता हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो आणि नागरी प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असा परभणीकरांना शब्द दिला. तो यशस्वी ठरला असे काँग्रेसच्या निकालाचे ‘निदान’ पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांनी केले.

राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या परभणीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार वरपूडकर ठरले आहेत. लातूरमध्ये पक्षाची सत्ता गेली असताना परभणीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवून देणाऱ्या वरपूडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना शहरातील सर्व धर्मीयांचा पाठिंबा मिळाल्याने विजय शक्य झाल्याचे सांगितले.

इतक्या जागा मिळतील हे अपेक्षित होते का?

– सर्वाधिक जागा मिळतील असे खात्रीने वाटत होते. २७ ते २८ जागा नक्कीच मिळणार असा विश्वास वाटत होता. पहिल्या क्रमांकावर पक्ष राहील अशीही ठाम खात्री होती. विरोधकांनी मोठय़ा प्रमाणात पशाचा वापर केला; अन्यथा आमच्या आणखी काही जागा निश्चित वाढल्या असत्या.

जागा वाढण्याचे प्रमुख कारण काय असावे?

– आमचे ‘सोशल इंजिनीअरिंग’ यशस्वी ठरले. िहदू कॉलन्यांमध्येसुद्धा आम्ही बऱ्यापकी मतदारांना आमच्याकडे वळविण्यात यशस्वी ठरलो. त्यातल्या त्यात शिवसेना, भारतीय जनता पक्ष या दोघांनीही मुस्लीम उमेदवार निवडणुकीत उतरविले. एकाने १४ तर दुसऱ्याने १५ मुस्लीम उमेदवार उभे केले होते. याचा सर्वात मोठा परिणाम असा झाला की शिवसेनेला िहदुत्ववादी प्रचार करता आला नाही. ‘खान हवा की बाण’ असा प्रचार शिवसेना करू शकली नाही. अशा वेळी जर सगळे राजकीय पक्ष सारखेच दिसत असतील तर त्यातला बरा पर्याय कोणता ते मतदारांनी ठरवले असावे. म्हणून मतदारांनी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक पसंती दिली.

तरीही काही तात्कालिक कारणे?

– पूर्णा या शहरात अशांतता निर्माण झाल्यानंतर परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटले. शहरातील दलितांनी शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कौल दिला. पूर्णा येथील प्रकरणाचा फटका निश्चितपणे शिवसेनेला बसला. त्याआधी राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी केली होती. राष्ट्रवादीने या पद्धतीने भूमिका घेतल्याने दलित-मुस्लिमांचा राष्ट्रवादीवर विश्वास राहिला नाही अशी काही कारणे सांगता येतील.

राष्ट्रवादीची एवढी पिछेहाट का झाली असावी?

– राष्ट्रवादीचा कोणीही नेता निवडणुकीत प्रभावीपणे उतरला नाही. माजी महापौर प्रताप देशमुख हे स्वत निवडणुकीत उभे नव्हते. अशावेळी लोकांनी कोणावर विश्वास ठेवून मते द्यायची? देशमुख यांची प्रतिमा चांगली आहे, पण ते उमेदवार नव्हते. अशावेळी शहरात नेतृत्व कोण करणार? पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी किंवा आ.विजय भांबळे हे थोडेच परभणीत येऊन नेतृत्व करणार होते? शहरात पक्षाकडे निवडणुकीत जो चेहरा असावा लागतो तोच नसल्याने मतदारांवर राष्ट्रवादीचा प्रभाव पडला नाही. शिवाय या पक्षाला सामाजिक समीकरणांची जुळवाजुळव करता आली नाही. परिणामी प्रभाग क्र.१० वगळता कुठेही िहदूबहुल कॉलन्यांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले नाही.

निवडणुकीत जवळचा शत्रू राष्ट्रवादीच होता काय?

– राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही आम्ही समविचारी पक्ष मानतो. त्यामुळे निवडणुकीत आम्ही आमचा जाहीरनामा मांडला, राष्ट्रवादीवर टीका केली नाही. अजूनही जिल्’ााच्या राजकारणात समविचारी पक्षांनी सोबत रहावे असे वाटते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सोबत राहण्यासाठी मी व्यक्तीश प्रयत्न केले, पण राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही. महापालिकेतही समविचारी पक्ष म्हणून राष्ट्रवादीला सोबत घेतले जाईल.

पण तूर्त तशी आवश्यकता आहे का?

– आवश्यकता नसली तरीही जिल्’ााच्या राजकारणात पुढच्या अनेक बाबी आहेत. विधान परिषद निवडणूक असो अथवा अन्य राजकीय घडामोडी असोत. दोघांनी सोबत रहावे असे वाटते. अर्थात आम्ही कितीही सकारात्मक भूमिका घेतली तरीही त्यांना आमची अ‍ॅलर्जी असेल तर आम्ही तरी काय करणार? पण आताही महापालिकेत ते आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागतच आहे. एकीकडे राज्य पातळीवर नेते सरकारच्या विरोधात संघर्ष यात्रा काढत असताना स्थानिक पातळीवर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी भाजपला सोबत घेत असेल तर मतदारांपर्यंत कोणता ‘मेसेज’जातो? खरे तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वानेही स्थानिक नेत्यांना याबाबत विचारले पाहिजे. परभणीत आम्ही काँग्रेससोबत राहू असे विधान राष्ट्रवादीच्या नेत्या खा.श्रीमती सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे मी स्वागत करतो. पण राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना यातले किती पटेल हा प्रश्नच आहे.

महापौरपदाबाबत काय?

पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून काँग्रेस पुढे आल्यानंतर महापौर आमच्याच पक्षाचा होणार ही बाब स्पष्ट आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल तो आम्हास मान्य आहे.