किमान सहा हजार रूपये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची गरज

यंदा चांगल्या पावसाने जिल्ह्यतील शेतकरी आनंदला असतानाही त्याच्यामागील शुक्लकाष्ठ संपण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नसून कापसाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने कापूस उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक महिन्यांपासून कमी भाव मिळत असल्याने जिल्ह्यतील कांदा उत्पादकांमध्ये निराशा पसरली होती. परंतु, अलीकडेच कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा झाली असताना आता कापसाचे दर खाली आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा निराश व्हावे लागले आहे.

जिल्ह्यातील नांदगाव, सटाणा, मालेगाव या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात कपाशीचे उत्पादन घेतले जाते. उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव जिल्ह्यात अधिक प्रमाणावर कपाशीचे उत्पादन घेतले जाते. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक मागील दोन वर्षांपासून कांद्याला भाव नसल्याने मेटाकुटीस आले होते. कांद्याला भाव मिळावा म्हणून शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या सर्व पक्षांनी अनेकवेळा आंदोलन केले. परंतु, या आंदोलनांचा कोणताही परिणाम झाला नाही. अखेर, मागील पंधरवाडय़ापासून कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

परंतु, शेतकऱ्यांमागील अडचणी संपता संपत नाहीत, असे म्हटले जाते. अलीकडेच शासनाच्या निर्णयामुळे बाजार समिती आणि शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. हा वाद अजूनही व्यवस्थित मिटलेला नसताना कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

सद्यस्थितीत व्यापाऱ्यांकडून या पांढऱ्या सोन्याची खरेदी अतिशय कमी दरात केली जात आहे. अवघे ३५०० रूपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. किमान सहा हजार रूपये प्रतिक्विंटल भाव कापसाला मिळण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. काबाडकष्ट करून कपाशीचे पीक उभे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी अत्यंत अल्प मोबदल्यामुळे काहीच मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऐन दिवाळीत हे संकट उभे राहिल्याने जो भाव मिळेल त्या भावात शेतकरी कापसाची विक्री करून मोकळे होत आहेत. यंदा चांगल्या पावसामुळे कापूस चांगला येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले.