नांदेड जिल्हा आणि ग्रामीण बँकेला सर्वाधिक फटका

जिल्ह्यच्या ग्रामीण भागात बँकिंग सेवा देणारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी तसेच महाराष्ट्र ग्रामीण या दोन बँकांना ‘मुद्रा तिजोरी’ (करन्सी चेस्ट) म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या दोन राष्ट्रीयीकृत बँकांनी मागील महिनाभरात सापत्नभावाची वागणूक दिली असून, त्यामुळे वरील दोन बँकांच्या सव्वाशेहून अधिक शाखांचे व्यवहार विस्कळीत झाले आहेत.

गेल्या महिन्यात ९ तारखेपासून केंद्र सरकारने एक हजार व पाचशेच्या नोटा चलनातून बाद करून दोन हजार व पाचशेच्या नवीन नोटा चलनात आणल्या. त्यानंतरच्या सव्वा महिन्यात येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखांकडे मुबलक चलनपुरवठा झाला तरी रिझव्‍‌र्ह बँकेच्या वतीने ‘मुद्रा तिजोरी’ अर्थात करन्सी चेस्टची जबाबदारीही पार पाडणाऱ्या या बँकांनी जिल्हा सहकारी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक या मोठा शाखा विस्तार असणाऱ्या वित्तीय संस्थांना त्यांच्या शाखांच्या प्रमाणात चलन उपलब्ध करून दिले नाही. परिणामी, या दोन्ही बँकांमध्ये प्रचंड चलनकोंडी झाल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जिल्ह्यात ६३ शाखा असून, १० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत या बँकेच्या येथील मुख्य शाखेने सुमारे ५० कोटी रुपयांची मागणी ‘एसबीआय’कडे केली, पण या बँकेला आतापर्यंत केवळ २ कोटी ५५ लाख रुपये मिळाले. या ग्रामीण बँकेचे मुख्यालय औरंगाबाद येथे आहे. तेथून तसेच इकडून-तिकडून उपलब्ध झालेल्या चलनाद्वारे शाखा चालवल्या जात आहेत.

बचत खात्यातून आठवडय़ाला २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा रिझव्‍‌र्ह बँकेने घालून दिली, पण ग्रामीण तसेच जिल्हा बँकांना पुरेसा चलनपुरवठा नसल्याने या बँकांचे लाखो खातेदार घायकुतीला आले आहेत. ग्रामीण बँकेच्या प्रत्येक शाखेत चलनाअभावी दररोज १०० ते २०० ग्राहकांना परत जावे लागत आहे. निश्चलनीकरणानंतर बँकांमध्ये रोख रकमेचा भरणा अत्यंत मर्यादित आणि ‘मुद्रा तिजोरी’तून तोकडा चलनपुरवठा यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्याचे ग्रामीण बँकेच्या येथील मुख्य शाखेचे व्यवस्थापक संजय जोशी यांनी सांगितले.

चलनकोंडीमुळे जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक अजय कदम व बँक प्रशासन हतबल झाले आहे. या बँकेच्या जिल्ह्यात ६८ शाखा असून, चलन देवाणघेवाणीचा व्यवहार अक्षरश: ठप्प झाला असल्याचे कदम यांनी सांगितले.

जिल्ह्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांच्या देयकांपोटी सुमारे १८ कोटी रुपये जारी केले असून ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खाती जमा झाली आहे, पण जिल्हा बँकेची ‘मुद्रा तिजोरी’ असलेल्या ‘एसबीएच’ने चलनपुरवठय़ाच्या बाबतीत हात आखडता घेतल्यामुळे ऊस उत्पादकांना रक्कम अदा कशी करायची, असा पेच बँक प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

काही बँकांच्या प्रमुखांनी आपली कैफियत जिल्हाधिकाऱ्यांच्या कानी घातल्यानंतर त्यांनी जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यास सांगितले, पण ‘मुद्रा तिजोरी’चे संचालन करणाऱ्या एसबीएच व एसबीआय या दोन बँकांनी आपल्या खातेदारांचे हित जपताना इतर बँकांना खूप कमी चलनपुरवठा करून परिस्थिती गंभीर केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. चलनाच्या बाबतीतील परिस्थिती सुधारेपर्यंत ‘मुद्रा तिजोरी’तून होणाऱ्या चलन वितरणात समानता आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्याची मागणी विविध बँकांकडून पुढे आली आहे.

जिल्ह्यत आतापर्यंत बँकांमध्ये ग्राहक अडचणी सहन करत आले आहेत. पण काही ठिकाणी ग्राहकांनी आत्महत्या करण्याची किंवा आत्मदहन करण्याची धमकी दिल्याचा अनुभव ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांना आला. गेल्या आठवडय़ात याच बँकेच्या विष्णुपुरी शाखेत चलनतुटवडय़ामुळे गोंधळ झाला.