सोनेखरेदीचा बनाव करून नाशिकरोड परिसरात भरदिवसा सराफी दुकान लुटण्याचा प्रयत्न दुकानदारांनी दाखविलेल्या धाडसामुळे फसला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोघे दुकानदार जखमी झाले; तर दुकानदारांनी केलेल्या प्रतिकारात एक दरोडेखोर जखमी झाला आहे.
नाशिकरोड येथे दत्तमंदिर परिसरात शहाणे ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास एका कारमधून पाच जण दुकानात आले. त्यांनी दुकानमालकाची चौकशी केली. त्या वेळी मालक अभय शहाणे हे दुकानात नव्हते. परंतु थोडय़ाच वेळात ते आले. पाच जणांपैकी एकाने सोनेखरेदी करावयाचे असल्याचे सांगितले. त्यानुसार शहाणे यांनी त्यांना दागिने दाखविण्यास सुरुवात करताच अचानक त्यांनी दागिने ताब्यात घेण्यास सुरुवात केली. अभय आणि सागर या शहाणे बंधूंनी त्यांना विरोध करताच दरोडेखोरांपैकी एकाने रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या. गोळीबारात शहाणे बंधू जखमी झाले. परंतु तरीही त्यांनी हिंमत दाखवीत प्रतिकार सुरूच ठेवला. त्यांनी फेकलेल्या काचेमुळे एक दरोडेखोर जखमी झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच दरोडेखोरांनी जखमी साथीदारास उचलून नेत कारमधून पळ काढला. घटनेचे वृत्त कळताच उपनगर पोलिसांनी धाव घेत सर्वत्र नाकेबंदी केली. या दरोडय़ात नेमका किती रुपयांच्या दागिन्यांची लूट झाली ते कळू शकले नाही. मागील आठवडय़ात शहरातील रविवार कारंजासारख्या मध्यवस्तीत सात ते आठ दुकाने फोडून झालेल्या लुटीचा अद्याप तपास लागलेला नसताना भरदिवसा सराफी दुकानात शिरून लूट करण्याचा प्रयत्न झाल्याने दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.