लातूर येथून बटाटा घेऊन सोलापूरकडे येणारी मोटारीची अन्य एका मालमोटारीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात सोलापूरजवळ चौघे मृत्युमुखी पडले. सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर शहराजवळील तळे हिप्परगा येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्यावरील गतिरोधकामुळे हा अपघात झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मोटार चालक बालाजी देवीदास गुळवे (वय २८, रा. गणेश नगर, लातूर) याच्यासह अकील मोहम्मद शेख (वय ४५), सचिन विनायक मोरे (वय २८) व अल्लावोद्दीन दस्तगीर शेख (वय ४०, तिघे रा. भाडगाव, ता. लातूर) अशी मृतांची नावे आहेत. लातूर येथे शेतक ऱ्यांनी उत्पादित केलेले बटाटे सोलापूरच्या कृषिउत्पन्न बाजारात विक्री करण्यासाठी आयशर गाडी (क्रमांक – एमएच १७ टी ७२८१) तुळजापूरमार्गे येत होती. गाडीत तिघे बटाटा उत्पादक शेतकरीही होते. गाडी लातूरहून तुळजापूरमार्गे सोलापूरकडे येत असताना शहराजवळ तळे हिप्परगे येथे रस्त्यावरील गतिरोधक या मोटारचालकाला दिसला नाही. गतिरोधकावरून तशीच भरधाव ही गाडी गेली व पुढे अन्य एका मालमोटारीवर (क्रमांक – एमएच २३ डब्ल्यू ३४१३) पाठीमागून आदळली. या अपघातात आयशर गाडीतील चालकासह चौघे जण जागीच मृत्युमुखी पडले. अपघातातील अन्य मालमोटारीचा चालक नेमीचंद रामभाऊ वरपे याने यासंदर्भात सोलापूर तालुका पोलिसांना कळविले.
सोलापूर तालुका पोलिसांनी या अपघाताप्रकरणी आयशरगाडीचा मृत चालक बालाजी गुळवे याचा दोष असल्याचे आढळून आल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला चौघा मृतांची ओळख पटली नव्हती. सकाळी उशिरा त्यांची ओळख पटली व चौघेही लातूरचे रहिवासी असल्याचे दिसून आले.