गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी पहिल्यांदाच रेल्वे प्रशासन पनवेल ते चिपळूण ही ‘डेमू’ (डीइएमयू) रेल्वेसेवा सुरू करणार आहे. या सेवेमुळे प्रवासी अवघ्या ५० रुपयांच्या तिकिटामध्ये पाच तासांत चिपळूण स्थानकात पोहोचू शकतील. परंतु ही रेल्वे चिपळूण स्थानकात पोहोचल्यावर तळकोकणाच्या प्रवासाचा पुढील टप्पा पार करण्यासाठी एसटी महामंडळाने चिपळूण-सावंतवाडी ही बससेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.गणेशोत्सवात रेल्वेचा ताण कमी करण्यासाठी पनवेल ते चिपळूण ही रेल्वेसेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ही रेल्वेगाडी ३० सप्टेंबपर्यंत सकाळी ११ वाजून दहा मिनिटांनी पनवेल स्थानकातून चिपळूणसाठी रवाना होणार आहे. या गाडीची तिकिटे आरक्षित करता येणार नसल्याने कोणत्याही स्थानकांमधील तिकीटघरांमधून सामान्य (जनरल) तिकिटे प्रवाशांना मिळू शकतील. पनवेल स्थानकामध्ये गर्दी होण्याच्या शक्यतेने रेल्वेगाडी फलाटावर अर्धा तास अगोदर लागणार असून रेल्वे पोलीस दलाच्या सहकार्याने बंदोबस्ताची व्यवस्था करणार असल्याची माहिती पनवेल रेल्वे स्थानकाचे स्टेशनमास्तर डी. के. गुप्ता यांनी दिली.या रेल्वे गाडीची तिकिटे पनवेल स्थानकातील जुन्या तिकीट खिडकीवरच मिळू शकणार आहेत. एकूण बारा डब्यांची ही गाडी आहे. ही गाडी रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगांव रोड, विर, सपेवामने, करंजाडी, विन्हेरे, दिवानखावटी, खेड, अंजनी या थांब्यांवर थांबेल. सायंकाळी चार वाजता ही गाडी चिपळूण स्थानकात पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी हीच गाडी साडेपाच वाजता चिपळूणहून पनवेलकडे रवाना होणार आहे. रात्री साडेदहा वाजता पनवेल स्थानकात ही गाडी पोहोचेल.

२८० रुपयांत तळकोकण
पनवेल-चिपळूण डीएमयूचे प्रवासी सायंकाळी चार वाजता चिपळूण रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर स्थानकाबाहेरूनच तळकोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विष्णू धुरे यांनी केली आहे. चिपळूण ते सावंतवाडी या पाच तासांच्या पल्ल्यावर धावणारी ही बससेवा सुरू झाल्यास गणेशोत्सव काळातील महामार्गावरील वाहनांचा ताण कमी होऊ शकतो आणि प्रवाशांनाही पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकेल. ही बससेवा सुरू झाल्यास सुमारे २८० रुपये तिकीट दरामध्ये पाच तासांचा प्रवास करून रात्री नऊ वाजेपर्यंत गणेशभक्त तळकोकणात पोहोचू शकतील. याबाबत एसटी महामंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक तोरो यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.