राज्याच्या कानाकोपर्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे बुधवारी  सकाळी ५.३० वा. च्या सुमारास उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. चौदा कुंडासह काशीकुंड आणि मूळ गंगा या ठिकाणी गंगामाई जोरदारपणे प्रवाहीत आहे. सध्या गंगातीर्थक्षेत्री भाविकांची स्नानासाठी गर्दी नसली तरी, गणेशोत्सवकाळात मोठय़ाप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन होते. त्यातच, सगळीकडे पाण्याचाय दुष्काळस्थिती असते त्या काळामध्ये गंगामाईने आगमन होत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, गेली चार वर्ष गंगामाईने सार्याचे अंदाज चुकवित थेट पावसाळ्यामध्ये आगमन केले. गतवर्षी २७ जुल रोजी गंगामाईचे उन्हाळे तीर्तक्षेत्री आगमन झाले होते. सुमारे १०२ दिवस वास्तव्य केल्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी गंगामाईचे निर्गमन झाले. त्यानंतर, सुमारे आठ महिन्याच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गंगामाईच्या आगमनामध्ये अनेक बदलाव झाल्याची स्थिती आहे. दरवर्षी गंगामाईचे आगमन होत असल्याने अनेकवेळा गंगामाईचे आगमन लोकांच्यादृष्टीने अफवाही ठरत आहे. त्याप्रमाणे आज सकाळीही गंगा आल्याची बातमी सर्वदूर पसरताच सुरूवातीला अनेकांना अफवा असल्याचे वाटले. त्यामुळे अनेकांनी गंगामाईच्या आगमनाची पाहणी करण्यासाठी गंगातीर्थक्षेत्री धाव घेतली. यावेळी पाहणी केली असता गंगामाईचे साक्षात आगमन झाल्याचे सार्याच्या निदर्शनास आले. यावेळी अनेकांनी गंगामाईच्या पहिल्या स्नानाचीही पर्वणी साधली. सध्या गंगातीर्थक्षेत्री पवित्रास्नानासाठी लोकांची गर्दी झालेली दिसत नाही. मात्र, गणेशोत्सवाच्या काळामध्ये मोठय़ासंख्येने मुंबईकर कोकणात दाखल होतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये गंगास्नानासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.