धुळे-इंदूर रेल्वेमार्गासह महामार्गाच्या कामाचे शनिवारी भूमिपूजन

नाशिक जिल्ह्य़ातील मनमाड, मालेगावमार्गे जाणाऱ्या धुळे-इंदूर या रेल्वे मार्गासह धुळ्यातून जाणाऱ्या नागपूर-सुरत आणि धुळे-औरंगाबाद या महामार्गाच्या कामांना आता प्रत्यक्षात सुरुवात होणार असून या महत्त्वाकांक्षी कामांसाठी केंद्र शासनाने १५ हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. रस्ता, वाहतूक, परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ५ नोव्हेंबर रोजी या कामांचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गाचा १५४ किलोमीटरचा भाग येत असून औरंगाबाद, कन्नड, चाळीसगाव, मेहूणबारे, धुळे असा मार्ग असेल. कन्नड घाटात ११.०५ किलोमीटर अंतराचा बोगदा तयार करण्यात येणार असून त्यासाठी चार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण मार्गावर ६३ लहान पूल, सात मोठे पूल आणि दोन उड्डाणपूल, बससाठी ६० तर मालवाहू वाहनांसाठी सहा ठिकाणी थांबे असतील. सुमारे २७ महिन्यांत हे काम पूर्ण होऊ  शकेल. मार्गावरचा एकूण खर्च तीन हजार १३१ कोटी रुपये असेल, असेही डॉ. भामरे यांनी नमूद केले.

नागपूर व्हाया धुळे-सुरत या राष्ट्रीय महामार्गाची तीन भागांत विभागणी झाली असून चिखली ते तरसोद, तरसोद ते फागणे आणि फागणे ते महाराष्ट्र-गुजरात सीमा अशी विभागणी करण्यात आली आहे. पैकी चिखली-तरसोद या ६३ किलोमीटरवर तीन मुख्य पूल आणि १८ लहान पूल आहेत. वरणगावजवळ वळण रस्ता व नशिराबाद येथे टोल प्लाझा असेल. यासाठी एकूण ९४८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तरसोद-फागणे या ८६ किलोमीटर अंतरात सहा मोठे पूल आणि २९ लहान पूल असतील. पारोळा, जळगाव, मुकटी अशा तीन ठिकाणी वळण रस्ते आणि दोन ठिकाणी रेल्वे पूल राहतील. धुळे तालुक्यातील आर्वी ते शिरुड दरम्यान २० किलोमीटर रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून त्यासाठी २० कोटी रुपये खर्च येईल. केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत गोंदूर, नगाव, मोराणे या वळणरस्त्याचे कामही सुरू आहे.

धुळेकरांसह मनमाड ते इंदूपर्यंतच्या भागातील सर्वासाठी मालेगाव, मनमाडमार्गे धुळे-इंदूर या रेल्वेमार्गाच्या कामासाठी १० हजार कोटी रुपये निधीची आवश्यकता होती. यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी प्रथम सुरेश प्रभूंनी पाच हजार कोटी दिले. त्यानंतर नितीन गडकरी या प्रकल्पासाठी धावून आले. त्यामुळेच रेल्वे मार्गाच्या एकूणच कामाला गती आली. म्हणूनच या रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहितीही डॉ. भामरे यांनी दिली.

धुळे जिल्ह्य़ाचा समावेश असलेल्या दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ासाठी २०२० पर्यंत प्राथमिक तयारी पूर्ण करावी लागेल. तरच हा औद्योगिक पट्टा अस्तित्वात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय सैनिकांना प्रतिकारासाठी पाठबळ

सीमेवर लढताना आपले दोन तर त्यांचे पंधरा ते वीस सैनिक मारले जातात. आपल्या सैनिकांचे यापूर्वी बांधलेले हात या सरकारने आता मोकळे केले आहेत. पाकिस्तानला रडीचा डाव खेळतानाही अपयश आले. त्यामुळे तो आत्मघातकी हल्ले करतो. आपला मूळ उद्देश सफल होऊ  नये म्हणून गोळीबारसारखे प्रकार घडविण्यात येतात. लक्ष विचलित करण्याचा हा पाकिस्तानी सैनिकांचा प्रयत्न आपल्या सैनिकांनी वेळोवेळी हाणून पाडला असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.