जागतिक बाजारात सांगली आणि नाशिकच्या द्राक्षाला यंदा प्रारंभीच्या काळात गेल्या वर्षीपेक्षा चांगली मागणी होती. द्राक्षमण्यातील औषधाची मात्रा कमी करीत युरोपीय राष्ट्राच्या मागणीनुसार कमी साखरेची म्हणजे १७ ब्रिक्स असलेली आणि १६ एमएस जाडीची द्राक्षे उत्पादन करण्यात जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी चांगले यश मिळविले. या वर्षी जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी ८४० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन केले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष पाठविण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची मानली जात असून यासाठी काही निकष लावण्यात आले आहेत. चिलीच्या द्राक्षाशी स्पर्धा करीत असताना द्राक्षमण्यातील कीटकनाशकाचा अंश कमी करणे, एगमार्क प्रमाणीकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र याबाबतीत बागायतदारांनी विशेष काळजी घेतली होती. यामुळे चिलीच्या तुलनेत युरोपीय बाजारात सांगलीच्या द्राक्षांना चांगली मागणी व दरही चांगला लाभत होता. निर्यातक्षम द्राक्षांना व्यापाऱ्यांकडून प्रति दोन किलो २३५ ते २५० रुपये दरही देण्यात आला. चालू वर्षी सांगलीतील ८४६ शेतकऱ्यांनी ६५५ हेक्टर क्षेत्रातील आठ हजार ७३४ टन द्राक्षांची निर्यात केली आहे. ही द्राक्षे ६७० कंटेनरमधून युरोपीय बाजारात दाखल झाली होती.

निर्यातीची प्रक्रिया सर्वसाधारण १५ दिवसांची असते. माल बागेतून काढणी केल्यानंतर सलग आठ तास कूिलगसाठी शीतगृहात ठेवला जातो. यासाठी व्यापाऱ्यांनी मिरज आणि सावळज येथे शीतगृहाची उभारणी केली आहे. सलग आठ तास शीतगृहात ठेवल्यानंतर ही द्राक्षे कंटेनरमधून युरोपीय प्रवासासाठी रवाना केली जातात. हे कंटेनरही शीतगृहासारखेच तापमान संरक्षित करणारे असतात. मुंबई बंदरातून हे कंटेनर थेट नौकेमधून प्रवासासाठी रवाना होतात. काढणीनंतर तब्बल दहा दिवसांनी ही द्राक्षे हिरवट रंगात युरोपीय नागरिकांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी सज्ज होतात.

गेल्या पंधरा दिवसांपासून तीव्र उष्णतेमुळे शीतगृहात ही द्राक्षे ठेवल्यानंतर आठ तासांनी मऊ पडत असून काही काळे डागही पडत आहेत. यामुळे दर १६० वर आला असल्याने निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी या द्राक्षाची खरेदी थांबविली आहे. याचा फटका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. या वर्षी सांगलीतून नेदरलँड, नार्वे, ब्रिटन, लॅक्झेम्बर्ग, जर्मनी, डेन्मार्क, फिनलँड, इटली, पोलंड, स्पेन, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, स्वीत्र्झलड, फ्रान्स आदी देशांत द्राक्षे निर्यात करण्यात आली. याशिवाय सौदी अरेबिया, श्रीलंका आणि बांगलादेशातही द्राक्षे पाठविण्यात आली. या वर्षी तर बांगलादेशात द्राक्षांना चांगली मागणी दिसून आली. मात्र या देशात युरोपपेक्षा जादा गोडीच्या द्राक्षांना मागणी आहे. बांगलादेशातील व्यापाऱ्यांनी सांगलीत राहून द्राक्ष खरेदी करीत ती केरळमाग्रे रवाना केली.

निर्यातक्षम द्राक्षांना चढता पारा सोसवेना

गेल्या १५ दिवसांपासून तापमान वाढत चालले आहे. सर्वसाधारण निर्यातक्षम द्राक्षाला ३४ अंश सेल्सिअस तापमान सहन होते, मात्र गेल्या काही दिवसांत हे तापमान ३९ ते ४२ अंशावर पोहोचल्याने त्याचा परिणाम द्राक्षाच्या मण्यावर होत आहे. मणी मऊ पडत असून कूिलगसाठी ठेवल्यानंतर मणी काळे पडत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांनीही ही द्राक्ष खरेदी बंद केली असल्याने १५० ते २०० हेक्टर क्षेत्रात निर्यातक्षम द्राक्षे तशीच आहेत.

निर्यातक्षम द्राक्षेही कमी साखरेची असल्याने गोडीला भारतीय बाजारात मागणी नसल्याने स्वीकारली जात नाहीत. या द्राक्षाचा बेदाणा करायचा म्हटले तर बेदाण्यासाठी आवश्यक ब्रिक्स २२ ठरते. हा निकष ही द्राक्षे पूर्ण करू शकत नसल्याने बेदाणाही करता येत नाही. परिणामी, नसíगक चक्रात निर्यातक्षम द्राक्षे अडकली आहेत.

यंदा जिल्ह्य़ातील ‘तासगणेश’, ‘सोनाका’, ‘थॉमसन’ या जातीच्या द्राक्षांनी युरोपमधील देशांसह १९ देशांतील नागरिकांच्या टेबलावर स्थान मिळवून निर्यातीत विक्रमी ८,७३४ टनापर्यंत मजल मारली. द्राक्षांनी युरोपीय बाजारात भरारी घेतली असतानाच हंगामाच्या अंतिम टप्प्यात तापमानाचा पारा ४० अंशावर पोहोचल्याने गुणवत्ता आणि दर्जा कमी झाल्याने द्राक्ष निर्यातदार अडचणीत आले आहेत.