विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक पक्षाला सन्मानाने जागावाटप व्हावे, या उद्देशाने आम्हाला किमान २० जागा मिळणे अपेक्षित असून तशी मागणी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाला डावलून युतीने जागावाटप केले तर राज्यात सत्ता येणे कठीण होईल, असा धमकीवजा इशारा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दिला.
रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या निमित्ताने ते येथे आले होते. विधानसभा निवडणुका दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने १० ऑगस्टपूर्वी जागावाटपाबाबत निर्णय अपेक्षित आहे. ५७ जागांची यादी महायुतीकडे देण्यात आली आहे. महायुतीच्या दोन बैठक झाल्या असून जास्त बैठकी घेण्यापेक्षा जागेबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आठवले यांनी केली.
विदर्भात किमान १३ जागा मिळणे अपेक्षित आहे. त्यात उत्तर नागपूर, राजुरा, चिमूर, वर्धा, अर्जुनी मोरगाव, मोर्शी, तिवसा, बडनेरा, मेहकर, राळेगाव, बाळापूर, वाशीम या जागांचा समावेश आहे. यांपैकी किमान काही जागांचा तरी विचार झाला पाहिजे. मनासारख्या जागा मिळाल्या नाही, तर काही तडजोड करावी लागेल. राज्यात आघाडी सरकारला पराभूत करणे, हे एकच ध्येय महायुतीसमोर असल्यामुळे महायुतीत सर्वच पक्षांना थोडीफार तडजोड करावी लागणार आहे. बहुजन समाज पक्षाला मते मिळत असली तरी त्यांचे उमेदवार निवडून येत नाहीत. उत्तर प्रदेशात त्यांना लोकसभेत एकही जागा मिळाली नाही त्यामुळे अन्य राज्यात त्यांना फार जागा मिळणे शक्य नाही.  नितीन गडकरी यांच्या हेरगिरी प्रकरणासंदर्भात काँग्रेसने चौकशीची मागणी केली असेल तर त्यांची खरेच चौकशी झाली पाहिजे. खरे काय ते समोर येईल. काँग्रेसजवळ कुठलाही विषय नाही. त्यामुळे सत्तेतील नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ते करीत असा आरोप केला.