इंटरनेट, भ्रमणध्वनी, फेसबुक व व्हॉट्सअपच्या आधुनिक काळात पोस्टकार्डच्या विक्रीत कमालीची घट झाली असून दररोज केवळ ४०० कार्डस्चीच विक्री होत आहे. अशाही स्थितीत डाक व्यवसायात मिडिया पोस्ट, डायरेक्ट पोस्ट, तत्पर धनादेश, आंतराष्ट्रीय धन अंतरण, स्पीडपोस्ट, लॉजिस्टीक पोस्ट, डाकजीवन विमा, ई-भूगतान, ई-डाक सेवांची मागणी मात्र सातत्याने वाढत आहे.
आजच्या आधुनिक काळात इंटरनेट, भ्रमणध्वनी, फेसबुक व व्हॉट्अपच्या माध्यमातून अवघ्या काही सेकंदात तुम्हाला संदेशाचे आदानप्रदान करता येते. ट्टिरवर स्वत:चे म्हणणे मांडता येते, तसेच पत्रव्यवहारही करता येतो. त्यामुळे आज पोस्ट खात्याचे महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबई व इतर मेट्रो शहरांमध्ये तर आजच्या मुलांना पोस्टमन, टपाल, पोस्टकार्ड याची माहिती सुध्दा नाही. ग्रामीण भागात सुध्दा इंटरनेट, भ्रमणध्वनी व फेसबुकचे जाळे विणले गेल्याने पोस्टकार्ड विक्रीवर त्याचा परिणाम झालेला आहे. त्यामुळेच येथील मुख्य पोस्ट ऑफिसमधून दररोज केवळ चारशे कार्डस्ची विक्री होत आहे. कधीकाळी हीच विक्री किमान चार ते साडेचार हजार असायची. शहरात पोस्ट कार्डची विक्री पूर्वीच्या तुलनेत कमी झाली असून आता फक्त कार्यालयीन कामासाठीच पोस्ट कार्डस्चा वापर होत असल्याची माहिती आहे. पूर्वी खेडय़ापाडय़ात आपल्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी अथवा स्वत:ची माहिती देण्याासाठी पोस्ट कार्डचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असे व पोस्टमनची वाट दिवसभर गावकरी बघत असत. याच पोस्टमनला गावकरी पोस्टकाका म्हणून संबोधित असत.   मात्र, सध्या चित्र बदलले आहे.
आता एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने चांगलीच भरारी घेतल्यामुळे नवनवीन उपकरणे उदयास आली आहेत. त्याच्या वापरामुळे काही सेकंदाच संदेश पाठवणे शक्य झाले आहे. सध्या भ्रमणध्वनीमुळे काही मिनिटातच आपल्या नातलगाची माहिती वा ख्यालीखुशाली जाणून घेता येते. इंटरनेटमुळे संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवता येतो व मोबाईलवर व्हॉटस्अपमुळे अवघ्या काही सेंकदातच माहिती व फोटो पाठवले जातात. या धावपळीच्या जगात या सर्व यंत्रणांनी पोस्ट कार्डची जागा घेतली आहे. पूर्वी अनेक कारणांसाठी पोस्ट कार्डशिवाय तात्काळ बातमी सांगायची झाल्यास ’तार’सेवेचा उपयोग करण्यात येत होता. आज मुले अथवा मध्यम वयातील व्यक्तीही डाकघरात जाऊन पोस्टकार्ड घेण्यात रस दाखवत नसून दोन सेकंदात भ्रमणध्वनी लावून पाहिजे ती माहिती प्राप्त करतात व आपल्या नातलगांची ख्यालीखुशाली जाणून घेतो. आज फक्त शहरातच या पोस्टकार्डची विक्री कमी झालेली नाही तर खेडय़ात व देशपातळीवरही ती कमी झालेली आहे. कारण, आज इंटरनेट, मोबाईल फोनचा वापर करून तरुण आपली कामे करीत आहेत. शहरातील मुख्य डाकघरातून प्राप्त झालेल्या माहितीतून रोज फक्त ४०० पोस्ट कार्डस्ची विक्री होत आहे. एका पोस्ट कार्डची किंमत ५० पैसे, तर बंद पोस्टकार्डची किंमत अडीच रुपये आहे. काळ बदलत असला तरी या कार्डाची किंमत मात्र बदललेली नाही, हे विशेष.
पोस्टकार्डच्या विक्रीत कमालीची घट झाली असली तरी डाकव्यवसायात मिडिया पोस्ट, डायरेक्ट पोस्ट, तत्पर धनादेश, अंतराष्ट्रीय धन अंतरण, स्पीडपोस्ट, लॉजिस्टीक पोस्ट, डाकजीवन विमा, ई-भूगतान, ई-डाक सेवा या ग्राहकांच्या पसंतीच्या सेवा आहेत. आजही या सर्व सेवांचा सर्वाधिक वापर होत आहे. शहरात पाण्याच्या टाकीजवळ एक मुख्य डाकघर असून सीटी पोस्ट कार्यालय एक आहे. मुख्य डाकघरात १३, तर सीटी पोस्ट कार्यालयात १५ ते १६ पोस्टमन आहेत. सध्या स्पीडपोस्टला मात्र वाव मिळत आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले एखाद्या परीक्षेचे फार्म लवकर पाठवायचे असल्याचे विद्यार्थी स्पीडपोस्टचा वापर करीत आहेत. हा स्पीडपोस्टचा वापर इतर कार्यालयीन कामासाठीही मोठय़ा प्रमाणात होत आहे. डाक व्यवसायात पोस्टकार्ड मंदावला असला तरी इतर कामे चांगली सुरू आहेत.
फक्त २८ पोस्टमन
सव्वाचार लाख लोकसंख्येच्या चंद्रपूर शहरात केवळ २८ पोस्टमन आहेत. मनपा क्षेत्रातील ३३ प्रभागात अवघ्या २८ पोस्टमनला पत्र पोहोचविण्याचे काम करावे लागते. आज टेलिफोन बिल सुध्दा पोस्टाच्या माध्यमातून पाठविले जाते. अशा स्थितीत अवघ्या २८ पोस्टमनला ३३ प्रभागांचे काम सांभाळणे कठीण झाले आहे.