जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात नव्याने रणशिंग फुंकण्याची घोषणा शिवसेनेतर्फे केली जात असतानाच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासनातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीने स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे.
माडबन जनहित सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर, डॉ. मिलिंद देसाई यांच्यासह सुमारे तीस जणांशी राणे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी गेल्या शुक्रवारी (३० ऑगस्ट) सविस्तर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांतर्फे या बठकीत पुनर्वसन आणि परिसर विकासाबाबत २५ मुद्दे सादर करण्यात आले. त्यापैकी बहुतेक विषयांचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर येत्या पंधरा दिवसांत संयुक्त बैठक आयोजित करून घेण्याचा मनोदय राणे यांनी जाहीर केला. तसेच स्थानिक पातळीवर सुटू शकणाऱ्या प्रश्नांच्या हाताळणीसाठी तातडीने स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वागत कक्षामध्ये हा विभाग सुरू झाला आहे. प्रकल्पग्रस्तांचे भूसंपादन, पुनर्वसन, पोलीस विभागाशी संबंधित प्रकरणे इत्यादींबाबत या विभागाद्वारे दखल घेऊन कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी अव्वल कारकून आणि लिपिकाची नेमणूक करण्यात आली आहे.  संबंधित प्रकल्पग्रस्तांनी त्याबाबतच्या लेखी तक्रारी किंवा समस्या या विभागात सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.