लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. काही ठिकाणी प्रचारसभा तर काही ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आज जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. “शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये संजय राऊतांनाही जागा नाही”, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“खरे म्हणजे आमच्या विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. पण त्यांची औकातच तेवढी आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचं नेतृत्व ठरवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक आपला देश कोणाच्या हातात द्यायचा त्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एकीकडे पर्याय नरेंद्र मोदी आहेत. त्यांच्याबरोबर महायुतीमधील सर्व पक्ष आहेत. तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. राहुल गांधी यांच्यामागे २६ पक्षांची खिचडी आहे”, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“आपल्या युतीचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत. त्या इंजिनला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत. त्या डब्यामध्ये दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी महिला, अल्पसंख्यांक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्वांना बसण्याची जागा आहे. सर्वांना यामध्ये बसून ‘सबका साथ सबका विकास, म्हणत आपली विकासाची गाडी पुढे चालली आहे. आता विरोधकांची काय अवस्था आहे. प्रत्येकजण स्वत:ला इंजिन समजत आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे. तेथे फक्त इंजिनच आहे. डब्बे नाहीत”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “माझा तुम्हाला प्रश्न आहे, इंजिनमध्ये सामान्य माणसांना बसायला जागा असते का? शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, त्यामध्ये संजय राऊतांनाही जागा नाही. विरोधकांच्या इंजिनमध्ये फक्त त्यांच्या परिवारासाठी जागा आहे. पण सामान्य माणसांसाठी जागा नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी संपूर्ण भारत हाच त्यांचा परिवार आहे. आता राहुल गांधी त्यांचं इंजिन दिल्लीकडे ओढतात, शरद पवार त्यांचं इंजिन बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे त्यांचं इंजिन मुंबईकडे ओढतात”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीवर केला.