आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची भारतीयांमध्ये क्षमता आहे. सध्या भारत २०२० च्या दिशेने वाटचाल करत असताना सर्वच स्तरावर आपण अधिक सक्षम होण्यासाठी तळागाळापर्यंत पोहोचणे जास्त गरजेचे आहे. तळागाळातील लोकांमधील क्षमता ओळखत त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांना मार्गदर्शन करत मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. या दृष्टीने पाऊले उचलण्यास निपमने सुरुवात केली आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांनी केले.
नॅशनल इन्स्टिटय़ूशन ऑफ पसरेनेल मॅनेजमेंट (निपम) नाशिक विभागाच्या वतीने पश्चिम विभागीय परिषदेचे उद्घाटन येथील हॉटेल ज्युपिटर येथे प्रदेश अध्यक्ष पी. एम. मंत्री यांच्या हस्ते झाले. या वेळी निपमचे आर. एस. जाधव, डॉ. उदय खरोटे, नाशिक शाखाध्यक्ष पी. टी. सावंत, रवींद्र चौबळ, अ‍ॅड. श्रीधर व्यवहारे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. कृष्णकुमार यांनी जगातील नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदावर २५ टक्के भारतीयच कार्यरत असल्याचा दाखला दिला.  भारतीय विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची दारे खुली करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून त्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंद आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या आदर्शाचा अंगीकार जर व्यवस्थापकांनी केला तर ते समाजाच्या दृष्टीने हितावह ठरेल. सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न होत असल्याचे कृष्णकुमार यांनी सांगितले.
मंत्री यांनी निपमच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत भविष्यातील काही योजनांबाबत माहिती दिली.