गेली काही महिने देशमुख कुटुंबीयांवर तोंडसुख घेत आक्रमक भूमिका घेणाऱ्या माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्यावर जि. प. अध्यक्षपद आपल्या पत्नीला द्यावे, या साठी स्वाभिमान गुंडाळून ठेवत आमदार दिलीपराव देशमुख व राज्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे मिनतवारी करण्याची वेळ आली.
कव्हेकरांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सर्व पक्ष अजमावून पाहिले. लातूर शहर, ग्रामीणपकी एका मतदारसंघात आपल्याला काँग्रेसने तिकीट दिल्यास निवडणूक लढवून विजयी होऊ, अशी भूमिका गेली दोन वष्रे ते मांडत होते. काँग्रेसमध्ये राहून स्वतचा गट निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कव्हेकरांची नाराजी काही प्रमाणात दूर करण्यासाठी देशमुख बंधूंनी त्यांची पत्नी प्रतिभा यांना जि. प.ची उमेदवारी दिली. त्या निवडूनही आल्या. त्यानंतर महिला-बालकल्याण सभापतीची संधी दिली. कव्हेकरांची आमदार होण्याची इच्छा असून त्यांचे या दृष्टीने प्रयत्न सुरूच होते. मात्र, काँग्रेसमधून उमेदवारी मिळणार नाही, याचा अंदाज घेत इतर पर्यायांचा विचार केला.
जि. प. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी असल्यामुळे कव्हेकरांनी आपल्या पत्नीसाठी आमदार दिलीपराव देशमुख, तसेच बाभळगाव येथे राज्यमंत्री अमित देशमुख यांची भेट घेऊन अध्यक्षपदासाठी मिनतवारी केली. काँग्रेसश्रेष्ठी उमेदवारी देतील, त्यांच्यामागे आपण राहणार असल्याचे पत्रकही त्यांनी प्रसिद्धीस दिले. राजकारणात काहीही होऊ शकते, हे कव्हेकर यांनी अशा प्रकारे पुन्हा सिद्द केले.