मुलाच्या जन्मानंतर एका वर्षाने वडिलांना खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. वडील २३ वर्षे तुरुंगात राहिले. त्यांच्या मायेला मुकलेल्या मुलाला त्यांच्या भेटीची आस लागली होती. शिक्षा भोगून वडील तब्बल २३ वर्षांनी तुरुंगाबाहेर आले. त्यांना पाहताच मुलाचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. पण दोन दशकांनी होणारी बाप-लेकाची भेट कदाचित नियतीलाही मान्य नव्हती. आनंदाच्या भरात २४ वर्षांच्या या मुलावर काळाने घाला घातला. त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. साजिद मकवाना असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. कळंबा तुरुंगाबाहेर मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, साजिदचे वडील हसन (वय ६५) यांना १९७७ मध्ये एका खुनाच्या गुन्ह्यात मुंबई पोलिसांनी अटक केली होती. हसन यांनी १९८१ मध्ये जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला नाही. त्यानंतर हसन यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात खटला चालवण्यात आला. न्यायालयाने या खूनाप्रकरणी हसन यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात करण्यात आली. नोव्हेंबर २०१५ मध्ये हसन यांना कळंबा तुरुंगात हलवण्यात आले. १९९६ पासून तुरुंगात असताना हसन यांनी कधीही पॅरोलसाठी अर्ज केला नाही. तुरुंगातील दूरध्वनीवरूनच ते त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत होते. गेल्या आठवड्यात गृह विभागाकडून हसन यांच्या सुटकेचे आदेश आले. १७ जानेवारी रोजी त्यांची सुटका करण्यात यावी, असे त्यात नमूद केले होते, अशी माहिती तुरुंग अधीक्षक शरद शेळके यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिली.

तब्बल २३ वर्षांनी हसन तुरुंगाबाहेर येणार होते. आपल्या कुटुंबीयांना तसेच मुलाला भेटण्याची आस त्यांना लागली होती. लहानपणीच पित्याच्या मायेला मुकलेल्या मुलालाही आपले वडील तुरुंगातून बाहेर येणार आणि आपण त्यांना भेटणार, या कल्पनेनेच मुलगा साजिद भारावून गेला होता. मुंबईतील अंधेरीत मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालवणारा साजिद तुरुंगातून बाहेर येणाऱ्या आपल्या वडिलांना घरी आणण्यासाठी कळंबा तुरुंगाबाहेर कुटुंबीयांसह उभा होता. मंगळवारी दुपारी हसन तुरुंगाबाहेर आले. त्यांना पाहताच साजिदसह त्याच्या कुटुंबीयांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. वडिलांना पाहताच साजिदचा डोळ्यांत आनंदाश्रू भरून आले. २३ वर्षांच्या ताटातुटीनंतर भेट झाल्याने हसनही भावनिक झाले. त्यांनाही रडू कोसळले. त्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. पण हा आनंदाचा झरा काही क्षणाचाच होता. कारण नियतीच्याही मनात बहुतेक तेच होते. वडिलांशी गप्पा मारतानाच साजिदच्या छातीत जोरदार कळ आली आणि तो क्षणार्धात जमिनीवर कोसळला. त्याच्या कुटुंबीयांनी लगेच त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. पण तेथे त्याला मृत घोषित केले. ज्या मुलाच्या भेटीच्या आशेने दोन दशकांहून अधिक काळ तुरुंगात काढला. तो मुलगा भेटल्यानंतर क्षणातच काळाने त्याला त्यांच्यापासून हिरावून नेले. साजिदच्या मृत्यूने हसन आणि त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.