राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यासह औरंगाबादमध्ये लक्षणीय यश मिळवले. यापूर्वी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप हा नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्याबाबतीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पक्षाने लक्षणीय यश मिळवले होते. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, आजच्या निकालांनी भाजपच्या या विजयी घौडदौडीला काहीप्रमाणात लगाम बसला. याउलट गेल्या काही निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळवून शकलेल्या काँग्रेसची मराठवाड्यातील कामगिरी यावेळी सुधारताना दिसली. मराठवाड्यातील नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष होते. यापैकी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या लढतीत अशोक चव्हाणांची सरशी झाली. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला केवळ नांदेडच्या बालेकिल्यातच नव्हे तर औरंगाबादमध्येही मोठे यश मिळाले. भाजपने मुखेड आणि कुंडलवाडी नगरपालिकांची सत्ता मिळवली असली तरी उर्वरित पालिकांमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. यामध्ये हदगाव, बिलोली, मुदखेड, देगलूर नगरपालिका आणि अर्धापूर नगरपंचायतीचा समावेश आहे. तर धर्माबाद व उमरी पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कंधार नगरपालिकेवर शिवसेनेने झेंडा फडकवला. या पालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली नसली तरी जिल्ह्यातील ९ पैकी सहा पालिकांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. याशिवाय, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व खुलताबाद नगरपालिकेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९ आणि ८ जागांवर विजय मिळवला आहे. या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदीही काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे हे यश भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार प्रशांत बंब यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का देणारे ठरले आहे. आजच्या निकालांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेसचे सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे हे चित्र भाजपसाठी आशादायी असले तरी निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष अब्दूल सत्तार यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर आगपाखड करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पक्ष नेतृत्त्वाने निवडणुकीच्या प्रचारावेळी अपेक्षित पाठिंबा न दिल्याचा आरोप यावेळी अब्दूल सत्तार यांनी केला.

तर दुसरीकडे पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विदर्भातील भंडारा व गडचिरोलीमध्ये पवनी नगरपालिकेचा अपवाद वगळता भाजपने निर्विवाद यश मिळवले. याशिवाय, दोन्ही जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. केवळ पवनी नगरपालिकेत स्थानिक आघाडीचा उमेदवार निवडून आला. या निकालांमुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा जिल्ह्यातील वर्चस्वाला शह दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भंडारा जिल्ह्यातील तुमसरनगर पालिकेतील २३ पैकी १५ , भंडारा पालिकेत ३३ पैकी १५ , साकोलीतील १७ पैकी १२ आणि पवनी नगरपालिकेतील दोन जागांवर भाजपने विजय मिळवला. तर गडचिरोली नगरपालिकेच्या २४ पैकी २० आणि देसाईगंज पालिकेच्या १७ पैकी १२ जागा जिंकत भाजपने विदर्भ आपला बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले.

 

Live Updates
09:36 (IST) 21 Apr 2020
गडचिरोली व देसाईगंज नगरपालिकांवर भाजपची सत्ता
09:35 (IST) 21 Apr 2020
गडचिरोली नगरपालिकेतील २१ जागांवर भाजप, काँग्रेस व शहर विकास आघाडी एका जागेवर, अपक्षांना दोन जागांवर विजय
10:00 (IST) 21 Apr 2020
भंडारा : भंडारा नगरपरिषदेत भाजप आघाडीवर
15:34 (IST) 19 Dec 2016
मराठवाड्यात काँग्रेस तर विदर्भात भाजपला मोठे यश
15:23 (IST) 19 Dec 2016
गडचिरोली, देसाईगंज, भंडारा, साकोली, तुमसर या पाचही नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष विजयी
13:40 (IST) 19 Dec 2016
गडचिरोलीत विजयाचा जल्लोष करत असताना नगरसेवकाच्या सासऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13:39 (IST) 19 Dec 2016
गडचिरोली नगरपालिकेतील २१ जागांवर भाजप, काँग्रेस व शहर विकास आघाडी एका जागेवर, अपक्षांना दोन जागांवर विजय
13:32 (IST) 19 Dec 2016
गडचिरोली व देसाईगंज नगरपालिकांवर भाजपची सत्ता
13:32 (IST) 19 Dec 2016
तुमसर नगरपालिकेच्या २३ पैकी १५ जागांवर भाजप विजयी
13:12 (IST) 19 Dec 2016
साकोली नगरपरिषदेच्या १७ पैकी १२ जागांवर भाजप विजयी
13:09 (IST) 19 Dec 2016
भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला भाजपचा धक्का; साकोली आणि तुमसर नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष
12:52 (IST) 19 Dec 2016
गडचिरोली नगरपालिकेवर भाजपची सत्ता; २५ पैकी २० जागांवर भाजप विजयी
12:47 (IST) 19 Dec 2016
मुदखेड नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता, मात्र नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवाराचा विजय
12:32 (IST) 19 Dec 2016
पैठणच्या नगराध्यक्षपदी भाजपचे सुरज लोळगे विजयी
12:32 (IST) 19 Dec 2016
पैठण नगरपालिकेत शिवसेनेचा ७ तर भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचा प्रत्येकी तीन जागांवर विजय
12:23 (IST) 19 Dec 2016
भंडाऱ्यातील साकोलीत भाजपला १७ पैकी ९ जागा
12:18 (IST) 19 Dec 2016
कुंडलवाडी नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष
12:18 (IST) 19 Dec 2016
नांदेड: हदगाव नगरपालिकेच्या १८ पैकी ८ जागांवर काँग्रेस विजयी
12:12 (IST) 19 Dec 2016
भंडाऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत
12:11 (IST) 19 Dec 2016
गडचिरोली जिल्ह्यात भाजपची सरशी; बहुतांश जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर
12:10 (IST) 19 Dec 2016
नांदेड : अर्धापूरमध्ये काँग्रेसला ३ जागा
12:09 (IST) 19 Dec 2016
भंडारा : भंडारा नगरपरिषदेत भाजप आघाडीवर
12:08 (IST) 19 Dec 2016
औरंगाबादमध्ये काँग्रेसचा भाजप आणि शिवसेनेला धक्का; चव्हाणांच्या आक्रमक प्रचाराला यश
12:02 (IST) 19 Dec 2016
तुमसर नगरपालिकेत भाजप व काँग्रेस प्रत्येकी ३ जागांवर विजयी
11:57 (IST) 19 Dec 2016
कंधार नगरपालिकेत शिवसेना १०, काँग्रेस ५ आणि अपक्षांना दोन जागांवर विजय
11:52 (IST) 19 Dec 2016
कुंडलवाडीत भाजप १० , काँग्रेस ४ आणि शिवसेनेला एका जागेवर विजय
11:50 (IST) 19 Dec 2016
कंधार पालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शोभा नलगे विजयी
11:50 (IST) 19 Dec 2016
अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकर यांची खेळी यशस्वी, भाजपला १० जागांवर विजय
11:50 (IST) 19 Dec 2016
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का; कुंडलवाडी नगरपालिकेत भाजपची सत्ता
11:42 (IST) 19 Dec 2016
गडचिरोली नगरपरिषद निवडणुक - एकूण जागा - २५ , निकाल जाहीर - १४ ,भाजप - ११, अपक्ष - २ , काँग्रेस - १
11:40 (IST) 19 Dec 2016
खुलताबाद नगरपालिकेत काँग्रेसला ८ , भाजपा ४, शिवसेनेला ३ आणि राष्ट्रवादीला २ जागा
11:36 (IST) 19 Dec 2016
नांदेडच्या हदगाव नगरपालिकेत शिवसेनेला सहा जागा
11:36 (IST) 19 Dec 2016
औरंगाबादच्या खुलताबाद नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता; नगराध्यक्षपदी काँग्रेसचे एस.एम. कमर विजयी
11:33 (IST) 19 Dec 2016
माहूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा, शिवसेनेला चार ,काँग्रेसला तीन , भाजप व एमआयएम प्रत्येकी एका जागेवर विजयी
11:33 (IST) 19 Dec 2016
राष्ट्रवादीने माहूर नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यातून खेचली
11:26 (IST) 19 Dec 2016
अर्धापूर ग्रामपंचायत आणि बिलोली नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता
11:11 (IST) 19 Dec 2016
नांदेडच्या अर्धापूर नगरपंचायतीत काँग्रेसला सहा जागा
11:11 (IST) 19 Dec 2016
पैठण नगरपालिकेत भाजपला दोन जागा; काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा
11:07 (IST) 19 Dec 2016
गडचिरोली नगरपालिकेत भाजपला सहा जागा; अपक्षांना दोन जागा
11:02 (IST) 19 Dec 2016
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या अनुराधा खांडरे विजयी
11:01 (IST) 19 Dec 2016
उमरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश; १७ पैकी १७ जागांवर विजय
10:37 (IST) 19 Dec 2016
तिसऱ्या टप्प्यातील नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात; मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश
10:06 (IST) 19 Dec 2016
औरंगाबाद आणि नांदेडमध्ये काँग्रेस व भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला
10:05 (IST) 19 Dec 2016
खुलताबाद नगरपालिकेत विक्रमी ८० टक्के मतदान; निकालाकडे सर्वांचे लक्ष
10:05 (IST) 19 Dec 2016
औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरूवात
10:04 (IST) 19 Dec 2016
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, प्रशांत बंब, अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला
10:02 (IST) 19 Dec 2016
नांदेडमध्ये अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे आणि भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला
10:02 (IST) 19 Dec 2016
अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
09:40 (IST) 19 Dec 2016
नांदेड जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि २ नगरपंचायती, औरंगाबादमधील ४, भंडारा जिल्ह्यातील ४ आणि गडचिरोली जिल्ह्यातील २ नगरपालिकांचा आज निकाल
09:37 (IST) 19 Dec 2016
मराठवाडा आणि विदर्भातील १९ नगरपालिका आणि २ नगरपंचायतीसाठींची मतमोजणी थोड्याच वेळात