सावित्री नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेनंतर तब्बल तेरा दिवसांनी आज वाहून गेलेल्या तवेरा गाडीचा शोध लागला असून, त्यासोबत दोन मृतदेहसुद्धा सापडले आहेत. नौदल पथकाने सुरु केलेल्या या शोधकार्यात वाहून गेलेल्या दोन्ही बसही सापडल्या. तब्बल १२ दिवस चाललेले हे शोधकार्य आज थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्याने पाण्यात पडलेल्या दोन बसपैकी एका बसचा सांगाडा गुरुवारी दुपारी नदीतून बाहेर काढण्यात आला होता. त्यामागोमाग दुस-या एसटीचा सांगाडा शनिवारी सापडला. त्यानंतर आज शोधकार्यादरम्यान  पाण्यात बुडालेल्या तवेरा गाडीचा शोध लागला. या गाडीत दत्ताराम निरगळ आणि संतोष वाझे यांचे मृतदेह सापडले. घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर तवेरा गाडीचे अवशेष सापडले आहेत. तवेरामधून एकूण नऊ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी चारजणांचा शोध काही दिवसांपूर्वीच लागला होता. या गाडीतील तीन व्यक्तींचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. आतापर्यंत तब्बल २८ व्यक्तींचे मृतदेह नौदलाच्या पथकाने पाण्याबाहेर काढले आहेत. तसेच, आता शोधकार्य थांबवत असल्याचे सांगत नौदलाने किनारपट्टीजवळ राहणा-या रहिवाशांना मृतदेह आढळल्यास कळविण्याची सूचना दिली आहे.
महाडजवळ सावित्री नदीवरील जुना पूल कोसळल्यामुळे दोन एसटी बससह दोन ते तीन वाहने त्यामध्ये बुडाली होती. त्यानंतर तीन ऑगस्टपासून लगेचच घटनास्थळी शोधकार्य सुरू करण्यात आले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे नदीत बुडालेल्या काहींचे मृतदेह आंजर्ले आणि हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यावर आढळले होते. नौदलासोबतच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) जवानही घटनास्थळी पाण्यात बुडालेल्या प्रवाशांचा आणि गाड्यांचा शोध घेत होते.