तिरुपती देवस्थान समितीकडून श्री महालक्ष्मीदेवीला अर्पण करण्यात आलेल्या शालूचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. येथील मानसिंग पांडुरंग खोराटे यांनी हा शालू ५ लाख ५५  हजार रुपये बोली करत घेतला. गतवर्षीपेक्षा यंदा शालूला तीन लाख रुपये कमी बोली झाली. या लिलावात शहरातील रघुनाथ चव्हाण व रवि म्हाकावेकर यांनीही सहभाग घेतला होता.
गेली काही वष्रे तिरुपती देवस्थानकडून नवरात्र उत्सवात महालक्ष्मीला सवाद्य शालू अर्पण केला जातो. नंतर या शालूचा लिलाव करण्यात येतो. त्याप्रमाणे आज शालूच्या लिलावाची सुरुवात  ४ लाख ५० हजारपासून करण्यात आली. अखेर बोली वाढत जाऊन ५ लाख ५५ हजार रुपयांना घेण्याचा मान मानसिंग खोराटे यांनी मिळवला. या वेळी खोराटे म्हणाले,  माझा व्यवसाय साखर आयात-निर्यातीचा असून २००० साली कोल्हापुरात आलो. श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने भरभराट झाली आहे. पत्नीच्या भक्तिखातर हा शालू कोणत्याही परिस्थितीत मिळवायचा होता. मनीषा खोराटे म्हणाल्या, गेली १४ वष्रे न चुकता श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला येते. देवीचे महावस्त्र मिळवण्याची फार दिवसांपासून इच्छा होती. अखेर तो दिवस उजाडला आणि माझी इच्छा पूर्ण झाली.
सन २०१३च्या लिलावामध्ये ७ जणांनी सहभाग घेतला होता. तो शालू घेण्याचा मान इचलकरंजीतील अशोक जांभळे यांनी ७ लाख ५० हजार रुपयांना घेतला होता. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, प्रमोद पाटील, दादासाहेब परब, संगीता खाडे, डी. एस. पाटील, एस. एस. साळवी, धनाजी जाधव, एम. बी. िदडे यांसह अन्य देवस्थान समितीचे सदस्य उपस्थित होते.