वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (वेकोलि) निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळे महानिर्मितीला वर्षांला ६५० कोटींचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असल्याची धक्कादायक माहिती ऊर्जा विभाग व वेकोलीच्या संयुक्त बैठकीतून समोर आली आहे.
राज्यात सर्वाधिक वीज निर्मिती करणाऱ्या महानिर्मितीला सातत्याने निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवठा होतो. त्याचा फटका वीज उत्पादनाला बसतो. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या अधिवेशनात या संदर्भात विधानसभेत अर्धा तास चर्चा घडवून आणली होती. या चर्चेला उत्तर देताना राज्याचे ऊर्जा मंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर झालेल्या बैठकीतून ही माहिती समोर आली आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मितीचे संचालक, वेकोलिचे अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
राज्यातील महानिर्मिती कंपनीला अंदाजे ६९ टक्के इतका कोळसा पुरवठा वेकोलिकडून करण्यात येतो. तसेच इतर राज्यांना ११० ते ११५ टक्के इतका कोळसा पुरवठा केला जातो. त्यामुळे महानिर्मिती कंपनीला निर्धारित वीज निर्मिती करता येत नाही. वेकोलिने महानिर्मितीला कोळसा पुरवठा करारानुसार शंभर टक्के कोळसा पुरवठा करून अतिरिक्त कोळसा बाहेरील राज्यांना द्यावा असे प्रधान सचिव अजय मेहता यांनी या वेळी सूचवले. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.
महानिर्मितीला कोळसा पुरवठा करणाऱ्या इतर कोल कंपन्यांपेक्षा वेकोलिच्या कोळशाची मूळ किंमत जास्त आहे. त्यामुळे अधिसूचीत केलेल्या कोळशाच्या किमतीपेक्षा वेकोलिची किंमत ४४ टक्के अधिक येते. वेकोलिचा ५० टक्के कोळसा महानिर्मिती कंपनीला मिळतो. त्याचा परिणाम वीज उत्पादन दरवाढीवर होत आहे अशी तक्रार महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी केली. कोळशाची प्रतवारी ठरवण्याचे अधिकारसुद्धा महानिर्मितीला द्यायला वेकोलि तयार नाही. कोळसा भरताना तसेच खाली करताना त्याचा दर्जा तपासण्याचे अधिकार मिळावेत म्हणून महानिर्मितीने अनेकदा वेकोलिकडे प्रस्ताव दिला. तो मान्य करण्यात आला नाही. दर्जा तपासण्याचे काम किमान संयुक्तपणे तरी करावे असे या बैठकीत सुचवण्यात आले. त्यावर वेकोलिने कोणतीही भूमिका घेतली नाही. वेकोलिच्या या आडमुठेपणामुळे महानिर्मितीला वर्षांला ६५० कोटींचा फटका बसत आहे, असे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

कोळसा आयातीची वेळ
वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी महानिर्मिती कोळसा आयात करीत आहे याकडे लक्ष वेधले. निकृष्ट दर्जाच्या कोळशामुळेच महानिर्मितीला एकूण गरजेच्या ७ ते ८ टक्के कोळसा आयात करावा लागतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.