गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न सातत्याने गाजू लागल्याने केंद्र व राज्य शासनाने विविध उपायांची अंमलबजावणी सुरू केली. डॉ. मनमोहन सिंग सरकारचे ७० हजार कोटी रुपयांचे व आता फडणवीस सरकारचे ३६ हजार कोटी रुपयांचे असे एक लाखांवर कोटींचे पॅकेज आले. याद्वारे कर्जमाफीचा प्रयत्न होऊनही कर्जदार शेतकरी ही संज्ञा कायम आहे. त्याचा वाढीव आकडा चिंताजनक असून, आत्महत्यांचा आलेखही खाली आलेला नाही. माफी किंवा मदत देऊनही गळफास घेण्याच्या घटना टळता टळत नाहीत. यात मुख्य बाब म्हणजे या सर्व भौतिक किंवा वित्तीय उपायांचा लाभ खरोखरच गरजूंना झाल्याची पाहणी नाही. परिणामी, कर्जमाफीने आत्महत्यांना बांध घातला गेल्याचे स्पष्ट होत नाही. भौतिक उपायांसोबतच मानसिक उपायांचा अवलंब आत्महत्या रोखण्यासाठी करायला हवा. कारण, आत्महत्यांची बाब ही अत्यंत खिन्नतेपोटी, हताश, नैराश्यातूनच उद्भवते, असे सूत्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने परस्कृत करून मराठवाडय़ानंतर विदर्भात समुपदेशनाचा उपक्रम प्रारंभ केला आहे. समितीचे पदाधिकारी व स्वत: मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांच्या नेतृत्वातील चमू वर्धा-यवतमाळ दौऱ्यावर येऊन गेला. शेतीमालाला योग्य भाव न मिळणे तसेच अन्य सामाजिक, आर्थिक, राजकीय पदर या आत्महत्यांमागे आहेत. मुळाशी मानसिक अस्वस्थता आहे. हे कबूल करावे लागेल. शेतकऱ्यांना योग्य वेळी भावनिक आधार देणारी व्यवस्था नाही. गावगडय़ातील संवाद संपुष्टात आलेला आहे. पारावरच्या गप्पांतून एकमेकांची दु:खे वाटून घेण्याची, समजून घेण्याची प्रथा संपली. त्यामुळे आत्महत्यांचा विचार डोकावणाऱ्या शेतकऱ्याला शास्त्रोक्त पद्धतीने भावनिक आधार देण्याची गरज मान्य केली पाहिजे. याच गरजेतून मानस मैत्री अभियान सुरू करण्यात आले आहे.

डॉ. हमीद दाभोलकर म्हणतात, जैविक, मानसिक व सामाजिक कारणांनीच आत्महत्या घडतात. जैविक म्हणजे वाडवडिलांपासून आत्महत्येचे प्रकार घडणे. स्वत: आत्महत्या करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखक डॉ. अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या सात पिढय़ांत आत्महत्या घडल्या होत्या. मानसिक म्हणजे ताण सहन न होणे, उतावीळपणा, लवकर राग येणे अशा तात्कालिक कारणांनी आत्महत्या होतात. मालाला रास्त भाव न मिळणे, स्पर्धा, प्रगतीचा प्रभाव अशा कारणांनी सामाजिक आत्महत्या घडतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सामाजिक व काही प्रमाणात मानसिक गटात मोडतात. त्या वेळीच टाळता येऊ शकतात.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गाजणाऱ्या वर्धा व यवतमाळ जिल्हय़ात मानस मैत्री उपक्रम सुरू झाला आहे. डॉ. स्वामिनाथन फाऊंडेशनच्या ६० महिला कार्यकर्त्यांना समुपदेशनाचे प्रशिक्षण स्वत: दाभोलकर यांनी दिले. बचतगट, कुपोषणमुक्ती, परसबाग व अन्य उपक्रमांच्या माध्यमातून शंभरांवर गावात कार्यरत असणाऱ्या या महिलांना प्राथमिक मार्गदर्शन झाले. हताश शेतकऱ्यांची लक्षणे, त्यांच्याशी संवाद साधणे, तीव्र व सौम्य मानसिक तणावाची ओळख, आत्महत्येचा धोका ओळखणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भावनिक गरज, मानसोपचाराची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांचा शोध अशा पैलूने प्रशिक्षणाचा पहिला टप्पा आटोपला. एकाच शेतकरी कुटुंबातील तीन पिढय़ांत आत्महत्या झाल्याचे एका महिलेने निदर्शनास आणले. त्यातूनच शेतीची अवस्था किती काळजीदायक होत आहे, हेच निदर्शनास आल्याचे संयोजक म्हणाले.

मानस मैत्री उपक्रम निश्चितच दिलासा देणारा ठरणार असल्याचा अंनिसला विश्वास आहे. त्यामागे एक निरीक्षण आहे. तीन वर्षांपूर्वी गारपिटीने बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी हे मराठवाडय़ातील जिल्हे झोडपून काढले होते. त्यातूनच आत्महत्याही घडल्या. अनेक कुटुंबासाठी ही संकटाची साखळीच ठरणार होती. ती तुटावी म्हणून डॉ. दाभोलकर व चमूने काही गावांना भेटी दिल्या. संकटातील शेतकऱ्यांना धीर दिला. जगण्याची उमेद मानसिक मनोबल उंचावून दिली. यावेळी लक्षात आले की, या संकटग्रस्तांना कोणी तरी ऐकून घेणारे हवे. ते मिळाले. त्यानंतरच्या पुढील काळात एकही आत्महत्या घडली नव्हती. मराठवाडय़ाच्या या दौऱ्यात त्यांना एक आगळा वेगळा प्रत्यय आला.

उस्मानाबाद जिल्हय़ातील एका गावात एकही आत्महत्या घडली नव्हती. कारण गावकऱ्यांना वेळीच दिलासा मिळाला होता. गारपीट झाल्यावर आठवडय़ातच एक व्यापारी या गावात पोहोचला. त्याच्याकडे नेहमी शेतमाल विकणारे शेतकरी रडू लागले. तेव्हा या व्यापाऱ्याने गरजेपुरते पैसे शेतकऱ्यांना दिले. त्यांची विचारपूस केली. पुढच्या वर्षी येणारे पीक मीच घेणार. गारपीट नेहमीच राहणार नाही. आज पीक गेले, उद्या परत येईल, असा व्यापाऱ्याने दिलेला दिलासा या गावकऱ्यांची जगण्याची उमेद वाढवून गेला. संकटग्रस्तांना तातडीने दिलासा, गरजेपुरती पण त्वरित आर्थिक मदत व पुढील भविष्याचा आशावाद या सूत्राने गावाला गळफास बसलाच नाही. हेच सूत्र प्रत्येक खेडय़ाला लागू होऊ शकते, असे डॉ. दाभोलकर म्हणतात.

डॉ. स्वामिनाथन फाऊंडेशनचे किशोर जगताप व अंनिसचे गजेंद्र सुरकार यांच्यावर मानस मैत्री उपक्रमाची जबाबदारी देण्यात आली आहे. फाऊंडेशनतर्फे  साठवर गावांत विविध उपक्रम चालतात. मानस मैत्री हा उपक्रम प्रत्येक गावात पोहोचेल. महिला कार्यकर्त्यांना सर्व पैलूने प्रशिक्षित केले आहे. शासनाच्या आधाराशिवाय हे असे मदतीचे हात शेतकऱ्यांना दिलासा देण्यात अधिक उपयुक्त ठरतील, असा विश्वास किशोर जगताप यांनी व्यक्त केला.