सावंतवाडी येथे आयोजित मिच्छद्र करंडक जिल्हास्तरीय मालवणी महोत्सवात मालवणी संस्कृती जपण्यासाठी मालवणी खाद्य जत्रा भरविण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला आहे. या खाद्य जत्रेत माशांचे तिखले, उकडय़ा भातासहीत मच्छीजेवण, वडे सागोती, शिरवाळे आदी खमंग मालवणी जेवणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ओकांर कलामंच सावंतवाडी यांच्या वतीने भाईसाहेब सावंत प्रतिष्ठानच्या सहकार्याने आयोजित मिच्छद्र करंडक मालवणी एकांकिका महोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मालवणी खाद्य जत्रेचे नियोजन करण्यात आले आहे याबाबतचे करण्यासाठी रविवारी येथील पर्णकुटी विश्रामगृहावर समिती सदस्यांची बठक घेण्यात आली. त्या नंतर पत्रकार परिषद घेवून कलामंचचे अध्यक्ष अमोल टेंबकर यांनी माहिती दिली. यावेळी प्रसिद्ध मालवणी कवी दादा मडकईकर, भाईसाहेब प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक विक्रांत सावंत, अ‍ॅड. रूजूल पाटणकर, मििलद कासार, प्रा.हसन खान, हेमंत खानोलकर, सचिन मोरजकर, हेमंत पांगम, आनंद काष्टे ,निरंजन सावंत आदी उपस्थित होते. यावेळी श्री टेंबकर म्हणाले, मिच्छद्र करंडक महोत्सव सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात २० ते २२ मे या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्रौ १० या वेळेत होणार आहे. या वेळी शाळेच्या पटांगणावर ही मालवणी खाद्य जत्रा भरणार आहे. या ठिकाणी असलेल्या विविध स्टॉलवर मालवणी पदार्थाची विशेष चव चाकरमार तसेच पर्यटकांना मिळणार आहे. यात माशांचे तिखले, उकडा भात माशांची कडी आणि कैरी असे जेवण तसेच घावने,चटणी, उसळ ,खापरोळी , धोंडास,कुवल्याची भाजी, शिरवाळे- रस ,अंडा करी ,मोदक, पुरणपोळी-रस आम्लेट, तिसऱ्या, सोलकढी आदी मालवणीची गोडी असलेले विविध पदार्थ त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. चायनीज पदार्थ वगळता चिकन बिर्याणी,अंडा बिर्याणी, प्रॉन्ज बिर्याणी आदी पदार्थ असणार आहेत. त्याच बरोबर आंबा, काजू,फणस आदी कोकणी मेव्यासह मालवणी मसाले तसेच अन्य घरगुती वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महोत्सवात स्थानिक बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्रा. हसन खान- ८२७५३९०६५३, आनंद काष्टे -९४२१०१०५०९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.