अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या इचलकरंजी नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्यासह नगररचनाकार व पथकातील कर्मचा-यांना जिवंत जाळण्याची व जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. या प्रकरणी शीतल आदिशा केटकाळे व अजितकुमार आदिशा केटकाळे (दोघे रा. प्रतीक प्लाझाजवळ) यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नगर रचनाकार दिलीप सर्जेराव चव्हाण (रा. कमला नेहरू हौसिंग सोसायटी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
कोल्हापूर रोडवर प्रतीक प्लाझा नामक व्यापारी व रहिवासी संकुल आहे. यामध्येच आदिशा पिराप्पा केटकाळे हे शीतल व अजितकुमार ही मुले व कुटुंबासह राहण्यास आहेत. ते राहात असलेल्या वॉर्ड नं. १९ घर नं. १४९ या घराच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम सुरू केले होते. पण त्यासाठी त्यांनी नगरपालिकेचा अधिकृत परवाना घेतलेला नव्हता. त्याबाबत पायगोंडा नरसगोंडा पाटील व इतरांनी पालिकेकडे तक्रार केली होती. नगरपालिकेने केटकाळे यांनी नोटीस देऊन अनधिकृत बांधकामाबाबत ३० सप्टेंबर २०१४ रोजी रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून केटकाळे यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे पालिकेकडे पुन्हा तक्रार प्राप्त झाली होती.
त्यानुसार गुरुवारी दुपारी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगररचनाकार दिलीप चव्हाण, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख सुकुमार कांबळे, शिपाई महावीर माणगांवे, धोंडिराम कांबळे, लक्ष्मण कांबळे, प्रदीप शेवाळे, राज बुचडे, िपटू कांबळे, सचिन कांबळे, संतोष गोसावी, विनायक लाखे, दयानंद कांबळे असे पथक अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेले होते. त्या वेळी शीतल व अजितकुमार केटकाळे हे आले आणि त्यांनी पथकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांना अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी आल्याचे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण केटकाळे बंधूंनी काहीही ऐकून न घेता नगररचनाकार चव्हाण यांना शिवीगाळ करत दमदाटी करू लागले. तर गळपट्टी धरून तुला आता सोडत नाही अशी धमकी देत धक्काबुक्की सुरू केली. त्या वेळी पथकातील कर्मचा-यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता केटकाळे बंधूंनी सर्वानाच शिवीगाळ सुरू केली. अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी केटकाळे यांना समजावण्याचा प्रयत्न करता दोघांनी त्यांनाही शिवीगाळ करत तुम्हाला येथून जिवंत जाऊ देत नाही, सर्वानाच जिवंत पेटवून देतो अशी धमकी देत धक्काबुक्की केली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण करून अतिरिक्त मुख्याधिका-यांसह अधिकारी व कर्मचारी यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी केटकाळे बंधूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.