आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलिसांनी मालेगाव नाका चौफुलीवर नाकाबंदी व कॉम्बिग ऑपरेशन सुरु केले आहे. या नाकाबंदीत पोलिसांनी अवैध दारूचा मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला. पोलिसांनी टाटा इंडिगो गाडीसह ५५ हजार रुपये किंमतीची अवैध दारू असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नरेंद्र दादाराम कलवर (वय २५, रा. दहेगाव, ता. चांदवड) याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके मालेगाव चौफुली येथे नाकाबंदी करत होते. या वेळी मालेगावच्या बाजूने टाटा इंडिगो वाहन मनमाडकडे येत असताना ही गाडी पोलिसांनी अडवली. या वेळी चालकाकडे विचारपूस सुरु केली असता तो गोंधळला. त्यामुळे पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये देशी- विदेशी दारूचे ११८ खोके मिळाले. या खोक्यात विविध कंपन्यांच्या दारूचा साठा सापडला. पोलिसांनी गाडीसह मुद्देमाल जप्त केला. दारूची अवैध व चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.