बारावीच्या परीक्षांमुळे मराठा क्रांती मोर्चाला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे. ६ मार्च रोजी मुंबईमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पुढील तारिख बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल असे या मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी म्हटले. मराठा क्रांती मोर्चा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी बारावीची परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा होईपर्यंत मोर्चे काढले जाणार नसल्याचे वृत्त आहे. ६ मार्च रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गणित, सांख्यिकी आणि हिंदीचा पेपर आहे. मराठा क्रांती मोर्चा या दिवशी झाला असता तर विद्यार्थ्यांना अडचण झाली असती. त्या दिवशी महाराष्ट्रातून लाखो लोक येणार होते. तसेच या दिवशी दुचाकी रॅली काढण्यात येणार होती. असे झाले असते तर विद्यार्थ्यांना वाहतुकीमध्ये अडकण्याचा धोका वाटत होता. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन समन्वय समितीने हा मोर्चा पुढे ढकलला असल्याचे म्हटले जात आहे. त्या दिवशी पेपर असल्यामुळे पालकांनी शिक्षण मंत्री यांच्या कानावर देखील हा प्रश्न घातला होता.

कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मराठा समाजाचे मूक मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत असून अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध निघणारे हे मोर्चे देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा समाजाच्या मोर्चाचे वादळ उपराजधानी नागपूरमध्ये धडकले होते. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनावर मराठा-कुणबी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव आले होते. या मोर्चाचे नेतृत्व तरुणींनी केले. विशेष म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यांना नोकरीमध्ये संधी मिळावी ही मागणी देखील होत आहे. याआधी निवडणूक असल्यामुळे मोर्चांना स्थगिती देण्यात आली होती. निवडणूक संपल्यानंतर हा मोर्चा निघणार होता परंतु मुलांच्या परीक्षांमुळे हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे.