चारित्र्याच्या संशयावरुन सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने स्वतःचे आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यात असणाऱ्या ऐचाळे गावातील जिजाबाई रामचंद्र साबळे (वय ३०) या विवाहितेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेच्या पतीसह सासरच्यांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. रोहिदास झिपरु धानोरे (वय २५, रा. शिरधाने ता. धुळे) विवाहितेच्या भावाने याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. रोहिदासने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहिण जिजाबाई हिचा २००८ मध्ये रामचंद्र मन्साराम साबळे (रा.ऐचाळे ता.साक्री) याच्याशी विवाह झाला. विवाहानंतर ६ ते ७ महिन्यानंतर पतीसह सासरच्या लोकांनी जिजाबाईच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. त्यातून ते तिचा वेळोवेळी शारीरीक मानसिक छळ करु लागले.

या त्रासाला कंटाळून २३ तारखेला ऐचाळे येथील पतीच्या घरात जिजाबाई हिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात ती गंभीरपणे भाजली. तिला तिच्या सासरच्यांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना सोमवारी रात्री जिजाबाईचा मृत्यू झाला. रोहिदास याच्या फिर्यादीवरुन रामचंद्र मन्साराम साबळे, मन्साराम नथु साबळे, सुमनबाई मन्साराम साबळे, मोहन मन्साराम साबळे, मिराबाई मोहन साबळे (सर्व रा.ऐचाळे ता.साक्री) या ५ जणांविरुध्द धुळे तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.