खादी ग्रामोद्योग आयोगाच्या वार्षिक डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरख्यावर सूत काततानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर गांधीप्रेमींनी सोमवारी (दि.१६) येथे तोंडावर काळ्या फिती लावून मूकमोर्चाद्वारे निषेध व्यक्त केला.
जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून आलेल्या महात्मा गांधींच्या समर्थकांनी आज सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ येऊन मूक निषेध व्यक्त केला.
आजपर्यंत देशाला अनेक पंतप्रधान लाभले. पण असे कृत्य आजवर कोणीही केले नाही. या डायरीवर फक्त महात्मा गांधीचेच चित्र असायला हवे, अशी मागणी समर्थकांनी या वेळी केली.

ज्या महात्मा गांधीनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, राष्ट्रपिता म्हणून ज्यांना देशाने किताब दिला त्या राष्ट्रपित्यांचा अपमान या पद्धतीने करणे हे अतिशय संतापजनक व हास्यास्पददेखील आहे. परकीय देशाच्या कापडावर ज्यांनी बहिष्कार टाकून चरख्याला प्राधान्य दिले. स्वदेशी कपड्यांचा नारा देशभर पसरवला. त्या राष्ट्रपित्यांचा फोटो काढून त्यांचा अवमान करण्यात आला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याची प्रतिक्रिया कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिली.
महात्मा गांधीनी देशासाठी परकीय वस्त्रांचा त्याग करत स्वदेशी पंचा घातला. लाखो रुपयांचा कोट घालणारे मोदी चरखा चालवणार आहेत का? अशी संतप्त प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली.
या आंदोलनात कॉम्रेड श्रीधर देशपांडे, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या वासंती सोर, रामभाऊ रायते, डॉ. डी. एल. कराड यांसह ७० ते ८० जणांनी सहभाग घेतला.
आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी गुरुवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मारक येथे गांधीवादी कार्यकर्त्यांनी बैठक बोलावली आहे. दरम्यान आंदोलनास कल्पना शिंदे, शांताराम चव्हाण, अॅड दत्ता निकम, संजय पवार, श्यामला चव्हाण, मनीषा देशपांडे, सचिन मालेगावकर, प्रा. मिलिंद वाघ, भिमाजी बावले, सीताराम ठोंबरे हे उपस्थित होते.