एखाद्या हॉलीवूडपटाच्या चित्रपटाचे कथानक वाटावे असा अद्ययावत बदल मुंबईच्या पोलीस दलात होत असून बॉम्बशोधक पथकामध्ये दोन रोबोट्स येथ आहेत.  बॉम्ब शोधणे आणि त्याला निकामी करण्याच्या कामात ते रोबोट्स पोलिसांना साथ देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे रोबोट्स वायरलेस असणार आहेत. ही एक प्रकारची कॉम्पॅक्ट मशीन असेल आणि बॉम्ब शोधणे आणि त्याला निकामी करणे ही दोन्ही कामे ही मशीन करू शकेल. या दोन रोबोट्ससाठी आम्ही ऑर्डर दिलेली असून लवकरच ती आमच्या बॉम्बशोधक पथकात सामील होईल असे पोलीस महासंचालक डी. जी. माथूर यांनी म्हटले.

रोबोट्स व्यतिरिक्त फुल बॉडी बॉम्ब सुट्स आणि डिजीटल वायरलेस अप्लिकेशन सिस्टम्स देखील येणार असल्याचे माथूर यांनी सांगितले.

जगात अनेक ठिकाणी पोलीस या यंत्रणेचा वापर करतात. या रोबोट्सला अनेक कंट्रोल अप्लिकेशनल असतात. जसं की एखाद्या पाकिटात किंवा खेळण्यामध्ये जर बॉम्ब असेल तर हा रोबोट त्याला शोधून काढतो. तसेच जी व्यक्ती हे हाताळत आहे त्याला रोबोटिक आर्मदेखील वापरता येतो. त्यामुळे घातपाताचा धोका कमी होतो.

या रोबोटला तुम्ही अनेक सूचना देऊ शकतात आणि तो त्या प्रमाणे कार्य करतो असे त्यांनी सांगितले. रोबोटला अनेक अॅसेसरीज जोडता येऊ शकतात जसे की कात्री, टॉर्च, एखादे हत्यार. या रोबोटला आपल्या १०० मीटर कक्षेतील बॉम्ब शोधता येऊ शकतो. तेव्हा हा रोबोट ट्रेनमध्ये जाऊ शकतो, बॉम्ब शोधू शकतो आणि तो निकामी करुन तुमच्याकडे आणून देऊ शकतो.

हे रोबोट माणसासारखे दिसणार नसून ती एक कॉम्पॅक्ट मशीन असणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. महाराष्ट्र पोलिसांच्या दलात याआधी देखील रोबोट्सचा वापर करण्यात आला होता. १९९० मध्ये महाराष्ट्र पोलिसांकडे रोबोट्स होते परंतु ती गोष्ट आता कालबाह्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस दल अद्ययावत करण्याच्या प्रयत्नातून हे करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या ज्या बॉम्ब सुट्सची ऑर्डर देण्यात आली आहे ते बॉम्ब सुट्स आताच्या सुट्सपेक्षा खूप निराळे आहेत. या सुट्समुळे पूर्ण संरक्षण होऊ शकते असे पोलिसांनी म्हटले.

या व्यतिरिक्त पोलीस कंट्रोल रुम वायरलेस अप्लिकेशन प्रोटोकॉलने अद्ययावत केली जाणार आहे. सध्या असलेली प्रणाली ही जुनी झाली असून उंच इमारतींमुळे सिग्नल्स मिळणे अवघड होऊन बसते या प्रणालीमुळे ही समस्या दूर होईल असे पोलिसांनी म्हटले.