असे म्हणतात की राजकारणात आणि युद्धात सगळे काही माफ असते. याच म्हणीचा प्रत्यय आज कुडाळमध्ये आला. परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन वजनदार नेते एकाच मंचावर आले. असे झाल्यावर राजकीय वर्तुळात काय आणि अवघ्या महाराष्ट्रात काय लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या नसत्या तरच नवल वाटले असते. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातले सख्य म्हणजे विळ्या-भोपळ्या इतके आहे हे अख्खा महाराष्ट्र जाणतो. मात्र शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच मंचावर बसल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले.

मुंबई गोवा महामार्गाच्या शेवटच्या चार टप्प्यांच्या कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले. त्या कार्यक्रमात लक्षवेधी ठरली ती या दोन नेत्यांची उपस्थिती. राणे आणि ठाकरे आमने-सामने आणि एकाच मंचावर आले ते तब्बल १२ वर्षांनी. त्यामुळे ते एकमेकांच्या विरोधात बोलून वातावरण तापवतील का? आणि बोलले तर काय बोलतील? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र तसे काहीही घडले नाही. हे दोन्ही नेते एकमेकांबाबत चक्क चांगल्याच पद्धतीने बोलले. एरवी उद्धव ठाकरेंचा वाट्टेल त्या शब्दात अपमान करायला नारायण राणे मागेपुढे पाहात नाहीत. तसेच नारायण राणेंच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्यात उद्धव ठाकरे कमी पडत नाहीत… अशात आज मात्र या दोन नेत्यांमध्ये शांतता आणि संयम दिसून आला.

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही स्वागत केले. विशेष बाब म्हणजे सगळ्यांचे आभार मानणारे जे बॅनर राणेंनी लावले होते त्यातून काँग्रेसचा पंजा गायब होता. त्यामुळे नारायण राणे भाजप प्रवेश करणार आहेत का? याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या कार्यक्रमात नारायण राणे यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्या एकत्र येण्यावर कविता केली. ज्यानंतर एकच हशा पिकला.
काय म्हटले रामदास आठवले?
आता होणार आहे मुंबई गोव्याला जाणे..
इकडे एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे.

नारायण राणेंकडून उद्धव ठाकरेंचा आदरार्थी उल्लेख

राज्यात देवेंद्र आणि केंद्रात नरेंद्र विकासासाठी काम करत आहेत. विकासाच्या आड राजकारण येता कामा नये असे नारायण राणे यांनी व्यासपीठावर बोलताना म्हटले आहे. इतकेच नाही तर एरवी कडवट शब्दांमध्ये शिवसेनेवर टीका करताना दिसणारे नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आदराने घेतले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना कधीही एकेरी उल्लेख केला नाही असेही त्यांनी आग्रहाने सांगितले. नितीन गडकरी यांना विकास पुरुष अशी उपाधी देऊन टाकली.

नाव न घेता नारायण राणे यांना उद्धव ठाकरेंचा सल्ला 

उद्धव ठाकरे काय बोलणार याचीही उत्सुकता सगळ्यांनाच होती. मुंबई गोवा महामार्ग व्हावा हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. ते पूर्णत्त्वास येते आहे याचा आनंद होत असल्याची बाब उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात नमूद केली. इतकेच नाही तर या चांगल्या कामासाठी सगळेच नेते एकत्र आले हे चांगले झाले असे म्हटले. त्याचप्रमाणे नारायण राणेंचे नाव थेट घेतले नाही तरीही मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू असताना स्थानिकांना काम मिळावे यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अन्यथा उपरे येतील असा सल्ला राणेंना दिला. नितीन गडकरी यांची ख्याती वेगाने काम करणारा मंत्री म्हणून आहे. त्यामुळे त्यांच्या काळात हा महामार्ग होईल असा विश्वास वाटत असल्याचेही नमूद केले.

कोकणच्या विकासासाठी तीन वर्षात एक लाख कोटींचे पॅकेज-गडकरी 

तिकडे नितीन गडकरी यांनी कोकणसाठी पुढील तीन वर्षात एक लाख कोटींचे पॅकेज दिले जाईल अशी घोषणा केली. सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध झुगारुन कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याचेही आवाहन केले.

कोकणचा विकास करणे ही आमची जबाबदारी-मुख्यमंत्री 

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे मुंबई आणि कोकण जवळ येणार आहे. कोकणाबाबत कायमच भाजप आणि शिवसेना सरकारने सकारात्मक विचार केला आहे.येत्या काळात या प्रांताचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आज झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विनायक राऊत, प्रमोद जठार, आमदार नितेश राणे या सगळ्यांचीच उपस्थिती होती.

कार्यक्रमाआधी घोषणाबाजी

मुख्य कार्यक्रम सुरू होण्याआधी काही प्रमाणात काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी झाली. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांच्या नावे घोषणा दिल्या. याप्रकरणी काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यामुळे श्रेयवादाची लढाई रंगते की काय असे वाटले होते. मात्र या घोषणाबाजीचा कोणताही परिणाम कार्यक्रमावर दिसून आला नाही.