कोटय़वधी रुपयांच्या केंद्र सरकारकडून आलेल्या योजना इचलकरंजी शहरात राबवणाऱ्या इचलकरंजी नगरपालिकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची अॅलर्जी असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ३१ ऑक्टोबरला एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कार्यक्रमपत्रिकेवर नरेंद्र मोदी यांचे नाव न लिहता मा. पंतप्रधान इतकाच उल्लेख करण्यात आल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच खासदार व आमदार या दोन्ही लोकप्रतिनिधींनाही या कार्यक्रमपत्रिकेतून वगळण्यात आले आहे.
इचलकरंजी नगरपालिका यूआयडीएसएसएमटी, भुयारी गटर योजना, घरकुल योजना अशी कोटय़वधी रुपयांच्या योजना केंद्र सरकारकडून आलेल्या रकमेतून राबवीत आहे. केंद्र शासनाकडून ३१ ऑक्टोबर रोजी एकता दौडचे आयोजन करावे, अशा सूचना सर्व राज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांना जिल्हाधिकार्यामार्फत २८ ऑक्टोबर रोजी दिल्या आहेत. त्यानुसार नगरपालिका सकाळी ८ वाजता शाहू पुतळा ते गांधी पुतळा या मार्गावर एकता दौडचे आयोजन केले आहे. या निमित्त निमंत्रणपत्रिका काढण्यात आली आहे. या निमंत्रपत्रिकेवर नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख टाळून फक्त मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या सूचनेप्रमाणे एकदा दौडचे आयोजन केल्याचे नमूद केले आहे. वास्तविक पदाबरोबरच पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख करणे अपेक्षित होते. मात्र ते टाळण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांचे नाव टाळल्याने शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. मोदी यांच्या नावाची पालिकेला अॅलर्जी आहे का? असे नागरिकांतून बोलले जात आहे. सहा महिने लोटले तरी राष्ट्रपती अथवा पंतप्रधान यांचा फोटो नगरपालिकेत अद्याप लावलेला पाहावयास मिळत नाही. तसेच शासनाचे उपक्रम राबवत असताना कार्यक्रमपत्रिकेवर स्थानिक लोकप्रतिनिधींचा उल्लेख करणे हा राजशिष्टाचार मानला जातो. मात्र या वेळी देखील खासदार राजू शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नावांचा उल्लेख कार्यक्रमपत्रिकेतून टाळण्यात आला आहे. मात्र निमंत्रणपत्रिकेवर एकूण १८ पदाधिकाऱ्यांची नावे घालून दौडमध्ये राष्ट्रीय ध्वजाचा वापर करणे आवश्यक असल्याच्या सूचना देण्यास पालिका विसरली नाही.