जयंत पाटलांच्या उपस्थितीत घटना; एकाची प्रकृती चिंताजनक
जेवणाच्या पंगतीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी येथे घडली. विशेष म्हणजे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या समक्षच ही घटना घडली. आज, राष्ट्रवादीच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आमदार जयंत पाटील सध्या सांगली जिल्ह्य़ाच्या विविध भागातील जिल्हा परिषद गटनिहाय दौरा करीत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी जत, आटपाटी, मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागाचा दौरा पूर्ण केला. गुरुवारी दुपारी त्यांनी येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. दुपारी एक वाजता ही बैठक सुरू होणार होती. त्यानंतर कार्यकर्त्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्ष बैठकीला दोन तास उशिराने सुरुवात झाली. साडेतीन वाजता आमदार पाटील यांचे मार्गदर्शनपर भाषण सुरू होताच भुकेने व्याकूळ झालेल्या कार्यकर्त्यांची जेवणासाठी लगबग सुरू झाली.
नाटय़गृहाबाहेर जेवणासाठी लावलेल्या शामियान्यात जेवणावळ सुरू झाली. त्यात जागा पकडण्यावरून कार्यकर्त्यांत वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. हे प्रकरण नंतर एवढे वाढले की, कार्यकर्त्यांनी एकमेकांना खुच्र्या फेकून मारायला सुरुवात केली. धक्काबुक्कीचेही प्रकार सुरू झाले. या सर्व गदारोळात चार कार्यकर्ते जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार पाहून जयंत पाटील यांनी घटनास्थळावरून हळूच काढता पाय घेतला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jun 2016 रोजी प्रकाशित
जेवणाच्या पंगतीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी
जेवणाच्या पंगतीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी येथे घडली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 10-06-2016 at 01:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp activists fight in sagali