काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राणेंवर जबरदस्त प्रहार केला आहे. राणे ज्येष्ठ नेते आहेत. ते निर्णय घेतील त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पक्ष बदलण्याचे प्रमाण वाढले आहे. सत्ता असेल तिथेच लोक जातात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात युवा संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त सांगलीत झालेल्या कार्यक्रमानंतर सुळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. नारायण राणे हे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना राणेंवर निशाणा साधला. राणे हे ज्येष्ठ नेते आहेत. ते निर्णय घेतील त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, असे त्या म्हणाल्या. सध्या राजकारणात विचारधारा अशी राहिलीच नाही. अनेक लोक पक्ष बदलत आहेत. सत्ता असेल तिथेच लोक जातात. त्यापेक्षा व्यवसाय करावा. जिथे नफा मिळतो तिथे जावे, असा सल्ला त्यांनी ‘दलबदलू’ राजकारण्यांना दिला.

यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढलेल्या दरांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. आघाडी सरकारच्या काळात इंधन दरवाढ झाली तर भाजपचे नेते रस्त्यावर उतरायचे. सरकारविरोधात जाहिरातबाजी केली जायची. पण आता भाजप सरकारच्या काळात सातत्याने दरवाढ होत आहे. हा न्याय आहे का, असा सवालही त्यांनी मोदी आणि फडणवीस यांना केला.