अवकाळी पावसाप्रमाणेच यावर्षी शिमग्यालाच वैशाख वणव्याचे ऊन पडत असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून पहाटे २० अंशापर्यंत खाली येणारा पारा दुपारी चाळिशी गाठत आहे. पानमळे आणि द्राक्ष पिकांच्या वाढीवर याचा मोठा परिणाम होत आहे.

मार्च महिना हा थंडीच्या हंगामाची सांगता आणि उन्हाळ्याची चाहूल असा असल्याने याच काळात द्राक्षाची खरडछाटणी घेतली जाते. फळकाढणीनंतर द्राक्ष वेलीला विश्रांती आणि नवीन फळधारणा होण्यास हा कालावधी महत्त्वाचा असतो. द्राक्षाची छाटणी झाल्यानंतर वलांडय़ांवर नवीन काडी तयार करणे, काडीमध्ये घडासाठी फळधारणा तयार करणे आदी नसíगक कामे होतात. मात्र यासाठी जास्तीत जास्त तापमान ३७ अंशापर्यंतचे तापमान वेलीला सहन होऊ शकते. नव्याने तयार होणाऱ्या काडीमध्ये फलधारणा करण्यासाठी ६५ दिवसांचा अवधी लागत असला तरी याच कालावधीत तापमान यावर्षी वाढल्याने फळधारणा होणार की नाही याची धाकधूक द्राक्ष उत्पादकांना लागली आहे.

द्राक्षपिकांना पाणी जरी मिळत असले तरी नवीन कोवळ्या पानात अन्नप्रक्रिया तयार करण्यासाठी आवश्यक सूर्यप्रकाश अधिक प्रखरपणे मिळत असल्याने वेलीची अन्न निर्मितीची प्रक्रिया थंडावली आहे. याचबरोबर शेंडे करपण्याचे प्रमाण वाढल्याने वलांडय़ांवर काडी टिकत नाही. कोवळ्या पानावर वाढत्या तापमानाचा परिणाम झाला असून तापमान कमी करण्यासाठी सायंकाळी वलांडय़ांवर पाण्याची फवारणीही करण्यात येत असल्याचे महावीर पाटील या द्राक्ष उत्पादकांने सांगितले.

पानमळ्यात उतरणीची कामे हिवाळ्याच्या अखेरीस म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पूर्ण करण्यात आली असून वाढत्या तापमानामुळे वेलीची वाढ खुंटली असून नवीन कैमार फुटीचे प्रमाण अत्यल्प आहे. याचे परिणाम म्हणून ऐन लग्न सराईत पानाला प्रचंड मागणी असूनही दराचा लाभ मिळत नाही. आजच्या घडीला बाजारात कळीच्या पानाचा दर कवळीला १५० ते २०० रुपयांवर पोहोचला असून जो माल टाकावू असतो अशा हक्कल पानाच्या कवळीलाही ३० ते ५० रुपये दर मिळत आहे. एका कवळीमध्ये ३०० पान असते. फापडा मालच तयार होत नसल्याने मुंबई बाजारात मद्रास पानाची सध्या चलती आहे. स्थानिक पानापेक्षा मद्रास पानाचा दर कमी असला तरी चव मात्र नाही.

उन्हाळी पिकाकडे यंदा फारसा शेतकरी वळला नसला तरी सिंचन सुविधा असलेल्या पश्चिम भागात या वर्षी उन्हाळी उडीद पिकाची लागवड काही प्रमाणात झाली आहे. अडीच महिन्यात हे पिक निघत असल्याने उसाच्या काढणीनंतर या पिकाची लागवड केली असली सकाळी गारवा आणि दुपारी रखरखते ऊन यामुळे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेंगवर्गीय भाजीपाल्याची फूलगळ होत असल्याने याचे परिणाम उत्पादनावर झाले आहेत. सध्या एका मोठय़ा पावसाची सर्वच पिकांना गरज आहे. मात्र अद्याप उन्हाळी पावसाचे आगमन झाले नसल्याने बागायती क्षेत्रात पिक वाढीवर परिणाम झाला आहे. येत्या दोन दिवसांत म्हणजे शनिवापर्यंत पावसाची चिन्हे असल्याचे इंटरनेटवरून दिसत असले तरी त्याचे प्रमाण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. पानमळ्याला तर तीन दिवसांनी दार मोडावे लागत असले तरी अपेक्षित गारवा मात्र मिळत नसल्याने वाढत्या दराचा लाभ उत्पादकांना घेता येत नाही.