नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाने ऑफलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची मुभा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील २१२ नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ऑनलाइन अर्ज दाखल करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत होता. निवडणूक आयोगाची वेबसाईट सुरु न होणे, वीज पुरवठा खंडीत झाल्याने अर्ज दाखल करता न येणे अशा असंख्य तक्रारींचा पाढाच उमेदवारांनी वाचून दाखवला होता. ऑनलाइन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रीयेविषयी अजूनही शंका असल्याने उमेदवारांकडून तांत्रिक चूका होतील आणि त्यामुळे त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ऑफलाइन अर्ज दाखल करु द्यावे अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. अखेरीस शुक्रवारी निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज दाखल करण्याची मुभा देत उमेदवारांना दिलासा दिला आहे.