उमरेड-करांडला अभयारण्याच्या पवनी वन्यजीव वनपरिक्षेत्रातील जंगलाजवळील प्रादेशिक वनविभागाच्या शेतात बिबटय़ाच्या शिकारप्रकरणी एका आरोपीला सात दिवसानंतर अटक करण्यात वनखात्याला यश आले. शिकारीसाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड, फासे जप्त करण्यात आले आहेत.
पवनी-खापरी रस्त्याजवळील शेतात धरणाच्या उजव्या कालव्याजवळ असलेल्या जंगलातील शेतात एक बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला होता. याची सूचना वन्यजीव वनविभागाला मिळताच तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यामुळे आरोपी हाती लागला. सोमवारी वनविभागाने दुसऱ्यांदा आणलेल्या प्रशिक्षित श्वानपथकाने या प्रकरणात वापरण्यात आलेल्या कुऱ्हाडीचा शोध लावला. जवळच्या बांध्यातील तणसाच्या ढिगात लपवलेल्या कुऱ्हाडीचा माग दाखवल्यामुळे त्या ठिकाणी कुऱ्हाड व लोखंडी तारांचा फास मिळाला. यात २४ फासे आहेत. त्यामुळे तपास शेती करणाऱ्यांवर केंद्रित करण्यात आला. शिकारीचे साहित्य मिळाल्यामुळे ही शेती करणाऱ्या परमानंद वातू लांजेवार (६०,रा. ताडेश्वर वार्ड, पवनी) या आरोपीला सोमवारी रात्री अटक करण्यात असून त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात ३ ते ७ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. आरोपीचा तीन दिवसांचा वनकोठडी रिमांड घेण्यात आला आहे. तपासाचे काम भंरारा येथील सहा.वनसंरक्षक व्ही.टी. बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली पवनी वनक्षेत्राधिकारी डी.डी. डुडे, वन्यजीव पवनी वनपरिक्षेत्राधिकारी डी.जे. गायकवाड, राजकमल जोब व वनकर्मचारी करीत आहेत.