स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी छापा टाकून गावठी बनावटीची बंदूक, सांबर जातीच्या वन्य प्राण्याचे शिंग यासह विलास ऊर्फ बबन आत्माराम सुतार या आरोपीला अटक केली.     
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात जिल्हय़ात विनापरवाना शस्त्र वापरणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला केली होती. या शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी या कामी एक पथक नियुक्त केले होते. पथकात आणंदूरपैकी सुतारवाडी (ता. गगनबावडा) येथील विलास सुतार ही व्यक्ती गावठी बनावटीची बंदूक बाळगून असल्याचे समजले. पथकाने २२ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता आणंदूर सुतार याच्या घराच्या मागे असलेल्या जनावरांच्या गोठय़ात छापा टाकला. या वेळी घेतलेल्या झडतीत ५० हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची बारा बारची सिंगल बारी बंदूक व एक लाख रुपये किमतीचे सांबर जातीच्या वन्य प्राण्याचे शिंग असा दीड लाख रुपयांचा माल जप्त केला. सुतार याच्या विरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार व वन्य जीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.