पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणालाही उत्तर देण्याची सवय नाही. त्यामुळे ते खासदारांवर संतापतात, असे म्हणत भाजप खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधानांवरच टीकास्त्र सोडले. शुक्रवारी नागपुरातील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या विश्रामगृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नाना पटोले यांनी ही टीका केली. नाना, तुमच्याकडे मंत्रिपद यायला हवे होते असे अनेक लोक आजही म्हणतात, मात्र मोदींच्या कारभारात मंत्री घाबरलेले असतात, मंत्र्यांची काय स्थिती आहे हे आपण पाहतो आहोत, त्यामुळेच मला मंत्रिपद नको, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक शरसंधान साधले.

महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाना पटोले यांची ओबीसींच्या मुद्द्यावर कानउघडणी केली होती. त्याची खदखद मनात असलेल्या पटोले यांनी मोदी उत्तर न देता फक्त खासदारांना प्रश्नच विचारत सुटतात असे म्हटले आहे. आम्ही प्रश्न विचारले की, तुम्हाला शासनाच्या योजनाही ठाऊक नाहीत, तुम्ही पक्षाचा जाहीरनामा वाचला नाही का? असे प्रश्न विचारून आम्हाला पंतप्रधानांकडून शांत केले जाते, असेही ते म्हणाले.

विदर्भ आणि गोंदियाचे प्रतिनिधित्त्व करणारे नाना पटोले यांची गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये घुसमट होते आहे. त्याचमुळे त्यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, अशी चर्चा नागपुरात रंगली आहे. केंद्रात ओबीसी मंत्रालय स्थापन झाले पाहिजे, वृक्ष संवर्धनांसाठी हरित कर आकारण्यात यावा, शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी सरकारने शेती क्षेत्रातील भागीदारी वाढवावी, असेही मुद्दे आपण नरेंद्र मोदींना न जुमानता मांडले आहेत, असा दावा पटोले यांनी केला.

मुख्यमंत्र्यांमध्ये निधी आणण्याची धमक नाही

आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच राज्यातही नैसर्गिक साधन-संपत्ती मुबलक आहे. असे असूनही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला सगळ्यात कमी निधी केंद्राकडून दिला जातो. केंद्राकडून जास्त निधी आणण्याची धमक मुख्यमंत्र्यांमध्ये नाही.

संसदेचे अधिवेशन होण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि राज्यातील खासदारांची बैठक होत असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे बैठक घेण्याची पद्धतच संपवून टाकली आहे, असाही आरोप पटोले यांनी केला. मुख्यमंत्री विदर्भातला असो, मराठवाड्यातला असो की पश्चिम महाराष्ट्रातला मुंबईत गेला की त्याची मानसिकता बदलते, असाही टोला नाना पटोले यांनी लगावला.