राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो म्हणतात. रायगड जिल्ह्य़ात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या याचाच प्रत्यय येतो आहे. राजकीय पक्ष स्थानिक पातळ्यांवर सोईस्कर आघाडय़ांसाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र निवडणुकीच्या निमित्ताने दिसून येत आहे. जिल्ह्य़ातील ९ नगरपालिकांसाठी येत्या २७ नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत. शेकाप आणि राष्ट्रवादीने या निवडणुका एकत्रित लढवण्याची यापूर्वीच घोषणा केली आहे.

याशिवाय समविचारी पक्षांना सोबत घेण्याची तयारी दोन्ही पक्षांनी दाखवली आहे. शिवसेनेनी नगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली असली तरी स्थानिक पातळीवर आघाडय़ांबाबत बोलणी सुरू आहेत.

अलिबागमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि भाजप, पेणमध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि भाजप,  मुरुडमध्ये शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, महाडमध्ये शेकाप राष्ट्रवादी आणि मनसे, माथेरानमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी, श्रीवर्धनमध्ये शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी होण्याची शक्यता आहे. महाड वगळता इतरत्र आघाडय़ांबाबत ठोस निर्णय झालेला नाही, मात्र स्थानिक पातळ्यावर बोलणी सुरू आहेत.

 

नाराजी दूर करण्याचा पवारांचा प्रयत्न

मुंबई : पक्षात सातत्याने होणाऱ्या कोंडीमुळे नाराज असलेले माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाधव यांना पाचारण करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतरही जाधव यांनी बुधवारी निवडणुकीच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीकडे बुधवारी पाठ फिरवली.

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूणमध्ये उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादीत १२ वर्षांपूर्वी प्रवेश केला. कामाची धडाडी, संघटनेत काम करण्याचे कौशल्य यातून राष्ट्रवादीने मंत्रिपदाबरोबरच त्यांच्यावर प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सोपविली होती. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी जाधव यांचे सूत जमले नाही आणि त्यातून जाधव यांची पद्धतशीरपणे कोंडी करण्याचे प्रयत्न झाले.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्य़ांची जबाबदारी पक्षाने जाधव यांच्याकडे सोपविली, पण चिपळूण या त्यांच्या कार्यक्षेत्रात रमेश कदम यांच्याकडे सूत्रे सोपविली. लागोपाठ तिसऱ्या निवडणुकीत चिपळूणमध्ये डावलण्यात आल्याची जाधव यांची भावना झाली आणि त्यांनी पक्षात राहण्याबाबत त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू झाले.