आकाशाकडे आशाळभूत नजरेने पाहणाऱ्यांची पावसाने अजून तरी अपेक्षापूर्ती केली नसली, तरी दिवसभरात पावसाच्या सरींनी चांगला शिडकावा केला. दिवसभर उकाडय़ाने लोक मात्र हैराण होते. लातुरातही अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना दिलासा दिला. शुक्रवारी चाकुरात जोरदार पाऊस होऊन तब्बल १०३ मिमी पावसाची एक दिवसात नोंद झाली. नदी, नाले, ओढे या पावसाने वाहते केले.
परभणी जिल्ह्याच्या काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला. या पावसाने मोठे नुकसानही केले. विशेषत: सेलू तालुक्यात सलग ४ दिवस हा पाऊस झाला. पूर्वमोसमी पावसाने जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, परभणी तालुक्यांतही हजेरी लावली. रोहिणी नक्षत्रास प्रारंभ झाल्यानंतर पाऊस येईल अशी अपेक्षा बाळगून असणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाने अजून ताटकळतच ठेवले आहे. मृगाने हजेरी लावली, तरी पावसाच्या सरी मात्र कोसळल्या नाहीत. क्वचित काही ठिकाणी चार-दोन शिडकावे झाले. पण वातावरणातला उष्मा कमी होईल, असा पाऊस अजून झाला नाही.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. कालपासून ढगाळ हवामान असल्याने पावसाची अपेक्षा होती. दररोजच सकाळी आकाशात ढग दाटून येत आहेत आणि पाऊस कोसळेल, अशी अपेक्षा व्यक्त होते. मात्र, अजून म्हणावी अशी सुरुवात पावसाने केलेली नाही. शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे प्रचंड उकाडाही होता. दुपारच्या दरम्यान शहरात पावसाच्या सरी कोसळल्या. केवळ १०-१५ मिनिटे कोसळलेल्या या पावसाने फक्त रस्ते ओले झाले आणि कुठे कुठे पाणी साचले. पावसाची सर येऊन गेल्याने उकाडा वाढतच गेला. सायंकाळी उशिरापर्यंत हवेत उकाडा जाणवत होता.

मृगाच्या पावसाने शेतकरी आनंदी
लातुरात मान्सूनपूर्व पावसाने मृग नक्षत्रात शेतकऱ्यांना दिलासा दिला असून जिल्हय़ात अनेक ठिकाणी शेतक ऱ्यांनी पेरणीची तयारी करू लागले आहेत. शुक्रवारी चाकुरात जोरदार पाऊस पडला. एक दिवसात तब्बल १०३ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे नदी, नाले, ओढे वाहते केले. शुक्रवारी सायंकाळपासून चाकूर तालुक्यावर वरुणराजाची चांगलीच मर्जी होती. चाकूर, वडवळ, नळेगाव, झरी व शेळगाव या सर्व मंडळांत जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी १५.८४ मिमी पाऊस झाला. लातूर तालुक्यातील कासारखेडा मंडळात ३५ मिमी, बाभळगाव ३०, लातूर शहर १८, रेणापूर ३०, चाकूर १०३, वडवळ ५६, नळेगाव ४८, झरी ३० मिमी पावसाची नोंद झाली. लातूर तालुक्यात १४.५०, औसा ७.८६, रेणापूर १७.७५, उदगीर ७.१४, अहमदपूर १४.६७, चाकूर ५०.८७, जळकोट २३.५०, निलंगा १.८८, देवणी १.६७ तर शिरूर अनंतपाळ १८.६७ पाऊस २४ तासांत पडला. या पावसाने चाकूर, शिरूर अनंतपाळ, जळकोट व निलंगा परिसरातील शेतकऱ्यांना ‘पेरते व्हा’चा संदेश दिला असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत.