सोलापूर शहर व जिल्ह्य़ात गेले दीड महिना दडी मारलेल्या पावसाचे अखेर पुनरागमन झाल्याने सर्वाना सुखद दिलासा मिळाला आहे. या संततधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान लाभल्याचे मानले जाते. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत शहरात २४ मिली मीटर तर जिल्ह्य़ात १०.८२ मिमी सरासरीप्रमाणे ११९.१७ मिमी पाऊस पडला. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.

राज्यात बहुतांश भागात यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असताना सोलापूर जिल्ह्य़ात पावसाने निराशाच केली आहे. पुष्य नक्षत्रातच जो काही पाऊस झाला, तेवढाच समाधानकारक ठरला. उर्वरित नक्षत्रांच्या पावसाने पाठ दाखविली. त्यामुळे आतापर्यंत एकूण पावसाच्या केवळ ६२ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. या कमी पावसामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचा हंगाम धोक्यात आला आहे. तर बऱ्याच गावांमध्ये व वस्त्यांमध्ये पिण्याचा प्रश्नही सतावत आहे. या पाश्र्वभूमीवर करमाळा भागात काही ठिकाणी आंदोलनेही झाली आहेत. जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनीही गेल्या आठवडय़ात अपुऱ्या पावसामुळे पीकपाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे सांगितले होते. येत्या दहा-पंधरा दिवसात पुरेसा पाऊस झाला नाही तर टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर उपाययोजना करण्याची वेळ येणार आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम

तथापि, पावसासाळ्यातील शेवटच्या चरणात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने सर्वत्र हजेरी लावून दिलासा दिला आहे. जिल्ह्य़ात तालुकानिहाय बुधवारी सकाळपर्यंत २४ तासांत पडलेल्या पावसाची माहिती अशी : उत्तर सोलापूर-१३.५४, दक्षिण सोलापूर-१०.१४, बार्शी-९.२०, अक्कलकोट-११.२२, मोहोळ-५, माढा-१४.१३, करमाळा-२.६३, पंढरपूर-१३.३४, सांगोला-१६, मंगळवेढा-१५.८० व माळशिरस-८ याप्रमाणे कमीजास्त प्रमाणात उत्तरा नक्षत्राच्या पावसाने दिलासा दिला आहे.

सांगली, मिरजेत पावसाची जोरदार हजेरी

दोन नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर उत्तरा नक्षत्राच्या पावसाने आज दिवसभर सांगली मिरजेसह जिल्ह्याच्या बहुंताश भागात हजेरी लावली. उत्तराच्या पावसाने रब्बी पिकांच्या पेरणीला अनुकूल स्थिती निर्माण होणार असून शाळूच्या पेरणीसाठी आणखी पावसाची गरज असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवडय़ानंतर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली होती. मात्र दोन दिवसापूर्वी सुरू झालेल्या उत्तरा नक्षत्राने बुधवारी सायंकाळपासून हजेरी लावली. सांगली, मिरजेसह तासगाव, खानापूर, आटपाडी तालुक्यात बुधवारी रात्री दमदार पाऊस झाला. आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. भिज पाउस असल्याने जमिनीत ओल चांगली झाली असून आता रब्बी पिकांच्या पेरणीला अनुकूल स्थिती असल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे.

खरीप हंगामातील मूग, उडीद या कडधान्याबरोबरच सोयाबीन पीकही काढणीला आले आहे. ही पिके काढून रब्बी ज्वारीच्या तयारीला वेळ लागणार असला तरी खरिपाच्या पेरण्याशिवाय खास रब्बीसाठी सोडण्यात आलेल्या रानात शाळू, हरभरा, करडई या रब्बी पिकांची पेरणी येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येईल असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन

महिनाभर दडी मारून बसलेल्या वरुणराजाचे बुधवारी पुनरागमन झाले. पावसाच्या तुरळक सरी दिवसभर बरसत राहिल्या. आज सूर्यदर्शन झाले नसल्याने काळय़ाभोर ढगांची गर्दी आकाशात झाली होती. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस समाधान देणारा ठरेल, असे दिसत आहे.