सध्या राज्यभरात उकाडा प्रचंड वाढला असतानाच पश्चिम महाराष्ट्रात मात्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या चार तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ‘स्कायमेट’कडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही तासांपासून कवठे महाकाळ, सांगली, सातारा, तासगावसह अनेक परिसरात गारांचा पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणचे वातावरण ढगाळ आहे. कालदेखील या परिसरात काही ठिकाणी पाऊस पडला होता. त्यानंतर आज दुपारपासून येथे गारांचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यंदा भारतात सर्वदूर चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. तर बुलडाण्यातील प्रसिद्ध भेंडवडमध्ये वर्तवण्यात आलेल्या भविष्यवाणीनुसार, यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. त्यामुळे पीकही साधारण येईल. तसेच अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीचे संकेतही देण्यात आले आहेत. यंदाच्या मोसमात जूनमध्ये कमी, जुलैमध्ये साधारण तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचं भाकित वर्तवण्यात आले आहे. याशिवाय, सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.