हिंदूहित पाहणारा भाजप आणि मुस्लीमहिताचे राजकारण करणारा एमआयएम यांचे एकूणच जाती-धर्माचे राजकारण एकमेकांना पूरक आणि लाभदायक आहे. यात अधिक लाभ होतो तो भाजपला, असे परखड मत रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांनी नोंदविले.
बुधवारी दुपारी येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना खासदार आठवले यांनी भाजप व संघ परिवाराचे राजकारण काहीही असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा कारभार राज्य घटनेच्या चौकटीत राहून उत्तम प्रकारे करीत असल्याचा अभिप्रायही नोंदविला.
एमआयएमने राजकारणात पदार्पण करताना औरंगाबादमध्ये ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग हाती घेतल्याच्या मुद्याकडे लक्ष वेधले असता खासदार आठवले म्हणाले,की हा प्रयोग चांगला आहे. परंतु एमआयएमचे राजकारण जातीयतेचे आणि हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारे ‘हॉट लाईन’चे आहे. परंतु दुसरीकडे भाजप, शिवसेनेचे राजकारणही हिंदुत्ववादाचे असल्यामुळे त्यातून सामाजिक ध्रुवीकरण होत आहे. म्हणजेच एमआयएम व भाजपचे राजकारण एकमेकांना पोषक आणि तेवढेच पूरक आहे. यात एमआयएमपेक्षा भाजपलाच राजकीय लाभ मिळू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.